Nanded: नांदेडचे व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख आरोपी ताब्यात, अल्पवयीन आरोपीला दिल्ली पोलिसांनी गुजरातमध्ये पकडलं
उद्योजक संजय बियाणी हत्याकांडातील मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदेड शहरातील शारदानगर स्थित संजय बियाणी यांच्या घरासमोरच भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.
Nanded Crime News : नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची 5 एप्रिल 2022 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. उद्योजक संजय बियाणी हत्याकांडातील मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदेड शहरातील शारदानगर स्थित संजय बियाणी यांच्या घरासमोरच भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. ज्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील नागरिकांत व व्यावसायिकांमध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शारदा नगर परिसरात सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास उद्योजक संजय बियाणी हे त्यांच्या गाडीने घरासमोर दाखल झाले. दरम्यान पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली. ज्यात त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. यातील दोन प्रमुख आरोपींपैकी गोळीबार करणारा आणि मोटारसायकल चालवत येऊन अंधाधुंद गोळीबार करणारा आरोपी दिल्ली पोलिसांनी जेरबंद केला आहे.
नांदेड पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SITगठित केली होती. हे पथक देशाच्या सहा राज्यात आणि बाहेर देशाची वारीही करून आले. हे मुख्य आरोपी अटकेत आणण्यासाठी नांदेड पोलिसांनी जंग-जंग पछाडले आणि आज दिल्ली पोलिसांनी गुजरातमधून सदर अल्पवयीन मुख्य आरोपीस ताब्यात घेतलं आहे. तब्बल सहा महिन्याच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना यातील मुख्य आरोपी पकडण्यात यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील मोहाली येथे गुप्तचर यंत्रणेच्या कार्यलयावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. ज्यात सदर आरोपी हा सह आरोपी आहे. नांदेड येथील संजय बियाणी यांच्या हत्येनंतर सदर आरोपीने दिल्ली आणि इतर ठिकाणी असे अनेक गंभीर गुन्हे केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान सदर आरोपी हा 18 वर्षे वयोगटाच्या आतील अल्पवयीन आरोपी आहे. सदर अल्पवयीन आरोपी हा उत्तरप्रदेश येथील फैजाबाद येथील रहिवासी आहे. ज्यास दिल्ली स्पेशल सेलने गुजरात मधून ताब्यात घेतले आहे.
कोण होते संजय बियाणी?
- संजय बालप्रसाद बियाणी हे मूळचे नायगाव तालुक्यातील कोळंबी येथील मूळ रहिवाशी होते.
- ग्रामीण भागातून येऊन नांदेड सारख्या शहरात स्वतः चा उद्योग उभारून एक वेगळी ओळख निर्माण केली.
- केबल TV व्यवसाय, मेडिकल स्टोर, जमीन खरेदी विक्रीतून व्यवसायाची सुरुवात केली.
- बियाणी डेव्हलपर्स या नावाने नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख.
- चार महिन्यांपूर्वी 72 गरीब माहेश्वरी समाजातील कुटुंबांना घरे वाटप केली.
- लग्न समारंभ, धार्मिक,सामाजिक कार्यक्रम, सर्वसामान्य, गरीब, गरजवंतांना नेहमीच मदतीचा हात देणारे अशी समाजात ओळख.
- नांदेड शहरातील राज मॉल, बियाणी हाईट्स, राज हाईट्स, राज मॉल,1,2 ,3, 4 ,5 अशी विविध व्यावसायिक व रहिवाशी इमारती त्यांच्या मालकीच्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या