'लग्न कर नाही, तर पळवून नेईन', सततच्या धमकीला कंटाळून नर्सिंगच्या विद्यार्थीनिची आत्महत्या
Beed Crime News: सतत धमकी मिळत असल्याने या तरुणीने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Beed Crime News: बीड शहराजवळील (Beed City) समनापूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका नर्सिंगचे शिक्षण (Nursing Education) घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली आहे. आरोपी तरुणाकडून 'लग्न कर नाही, तर पळवून नेईन' अशी सतत धमकी मिळत असल्याने या तरुणीने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सुमित्रा राजू ईटकर (वय 22 वर्षे, रा. हिरापूर ता. गेवराई, हमु. बीड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, किशोर कचरू साठे (रा. गौतम बुध्द कॉलनी, बीड) व सम्यक संजय पारवे (रा. राजीव गांधी चौक, बिंदुसरा कॉलनी, हमु, मित्रनगर, बीड) यांचा आरोपींचे नावं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा ही बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेत होत होती. दरम्यान तीन वर्षापासून तिची किशोर साठेशी ओळख होती. या ओळखीतून तो तिच्याकडे सतत लग्नाची मागणी करत होता. एवढंच नाही तर माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला पळवून नेईन व जीवे मारून टाकीन, अशी धमकी किशोर साठे देत सुमित्रा देत होता. याचवेळी किशोरचा मित्र सम्यक पारवे यानेही सुमित्राला लग्न करण्याकरता तिच्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे या दोघांच्या जाचास कंटाळून अखेर सुमित्राने समनापूर शिवारात जाऊन एका विहिरीत उडी घेतली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
समनापूर शिवारात एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती गावात पसरल्याने ही घटना उघडकीस आली. तर याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. तर मयत सुमित्राची बहीण संगीता लष्करे (रा. हिरापूर सोन्याबापू लष्करे ता. गेवराई हमु, वंजारवाडी ता. गेवराई) यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण ठाण्यात किशोर साठे व सम्यक पारवे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
नेहमीच्या त्रासाला कंटाळली होती सुमित्रा...
आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने सुमित्राचे शिक्षण केले. पुढे तिचा प्रवेश बीएस्सी नर्सिंगसाठी घेतला. त्यामुळे सुमित्रा देखील मेहनत घेत होती. मात्र याचवेळी तिची ओळख किशोरसोबत झाली. मात्र किशोर एकतर्फी प्रेमातून सुमित्राला लग्न करण्यासाठी दबाव आणत होता. सुमित्राने अनेकदा नकार देऊन देखील तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्यातच लग्न न केल्यास पळवून नेण्याची धमकी देत होता. त्यामुळे सुमित्रा या त्रासाला कंटाळली होती. तिची इच्छा नसतांना देखील किशोर आणि तिचा मित्र तिला लग्न करण्यासाठी सतत त्रास देत असल्याने अखेर तिने आत्महत्या करत आपले जीवन संपवले.