Aurangabad: औरंगाबादमध्ये वर्गात शिकवताना शिक्षकाला हृदयविकाराचा धक्का; डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित
Aurangabad News: विद्यार्थ्यांना वर्गात शिकवतानाच शिक्षकाला (Teacher) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Aurangabad News: औरंगाबादच्या (Aurangabad) लासूर स्टेशन परिसरातील जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad School) एक धक्कादायक घटना घडली. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवतानाच शिक्षकाला (Teacher) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी, 30 जानेवारी दुपारी दीडच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या शाळेतच ही घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सुरेश निवृत्ती राऊत (वय 43 वर्षे, मुळगाव-धोंदलगाव, ता. वैजापूर) असे या मृत शिक्षकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी आहे की, जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे सुरेश राऊत हे शिक्षक विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांमध्ये सर्वांना प्रिय शिक्षकांपैकी एक होते. अत्यंत शिस्तीत व शाळेची वेळ पाळणारे राऊत गुरुजी अशी त्यांची वेगळी ओळख होती. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आवडीचे शिक्षक म्हणून देखील त्यांना ओळखले जात होते. दरम्यान सोमवारी नेहमीप्रमाणे राऊत शाळेत आले होते. शाळेत आलेल्या राऊत यांनी प्रार्थना, परिपाठाला सर्वांसोबतच नित्यनियमाने हजेरी लावली होती. यावेळी त्यांना कोणताही त्रास देखील जाणवला नव्हता.
वर्गात जाताच जमिनीवर कोसळले
दरम्यान, दुपारी दीड वाजता मध्यंतरात सहकारी शिक्षकांसोबत सुरेश राऊत यांनी जेवण केले. जेवण झाल्यावर ते वर्गात गेले. मात्र वर्गातच जाताच त्यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. विद्यार्थ्यांनी राऊत भोवळ येऊन पडल्याचे पाहिले व लगेच इतर शिक्षकांना याची माहिती दिली. त्यामुळे शिक्षकांनी वर्गात धाव घेतली. तसेच ग्रामस्थ आणि शिक्षकांनी तात्काळ वाहनातून लासूर स्टेशनच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. मात्र येथे डॉक्टरांनी तपासून सुरेश राऊत यांना मृत घोषित केले.
ग्रामस्थांत शोककळा पसरली
सुरेश राऊत यांची शाळेत शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळख होती. तर गावातील गावकऱ्यांमध्ये देखील ते लोकप्रिय होते. त्यामुळे गावकऱ्यांशी त्यांचा नेहमी संपर्क असायचा. मात्र त्यांच्या या अकाली निधनाने विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांत शोककळा पसरली असून, या दुर्दैवी घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत शिक्षकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भावजय आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. धोंदलगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांना रडू कोसळले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
अर्ध्यावरती डाव मोडला! प्रेमविवाहानंतर तीन महिन्यांतच तरुणीनं संपवलं जीवन...