Aurangabad: 'या गद्दरांचं करायचं काय,खाली...' म्हणत शिवसेना रस्त्यावर
ShivSena protest: 'आम्ही शिवसेने'तच अशा आशयाचे होर्डिंग यावेळी शिवसैनिकांनी लावले.
ShivSena protest: एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. अशात शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र याचवेळी राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आज शिवसेनेकडून बंडाच्या विरोधात निदर्शने करून, शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकात सुद्धा शिवसैनिक मोठ्याप्रमाणावर जमा झाले असून आंदोलनाला सुरवात झाली आहे. तर 'या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणा देण्यात आल्या.
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात निदर्शने करण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेचे महिला आघाडी, युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांचा सहभाग पाहायला मिळाला. तसेच 'आम्ही शिवसेनेसोबत' अशा आशयाचे होर्डिग पाहायला मिळाले. 'उद्धव ठाकरे साहब आगे बडो, हम तुम्हारे साथ है', शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है, या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय, उद्धव साहब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, आशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शिवसैनिकांमध्ये मोठा रोष आहे...
यावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, बाहेर गेलेल्या लोकांनी आजची ही गर्दी बघावी. जनता आजही शिवसेनेच्या सोबत आहे. स्थानिक शिवसैनिकांमध्ये मोठा रोष आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. गेलेली लोकं आजही आमचे सहकारीच आहे. त्यामुळे त्यांनी परत यावे. नेते गेले असली तरीही कार्यकर्ते अजूनही शिवसेनेतच आहे, असेही दानवे म्हणाले.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम...
आपले नेते एकनाथ शिंदे सोबत गेल्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या कार्यर्कत्यांनी आता सेनेबरोबर राहावे की नेत्यासोबत जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यात बंड करून गेलेले नेते सुद्धा स्वतःला अजूनही शिवसैनिकच म्हणत असल्याने कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक शिवसैनिकाचे लक्ष एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लागले आहे.