औरंगाबादेतील संग्रामनगर उड्डाणपुलावरील वाहतूक महिनाभरासाठी बंद; 80 हजार लोकांना बसणार फटका
Aurangabad News: बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलाखाली व संग्रामनगर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे
Aurangabad News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) शहानिरमियाँ दर्गा चौक-संग्रामनगर उड्डाणपूल ते बीड बायपास-गोदावरी टी या मार्गावरील वाहतूक 6 फेब्रुवारीपासून 30 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलाचे (Aurangabad Police News) पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी याबाबत आदेश काढले आहे. बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलाखाली व संग्रामनगर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर महिनाभरासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
बीड बायपासच्या काँक्रीटीकरणासह देवळाई चौक, गोदावरी टी पॉइंट व एमआयटी चौकात उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. गोदावरी टी पॉइंट येथील उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुलाखालील रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. याशिवाय गोदावरी टी पॉइंट येथून ते संग्रामनगर उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, वाहतुकीस अडथळा होऊन गौरसोय होऊ नये म्हणून रस्त्याचे काम होईपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरातील शहानिरमियाँ दर्गा चौक-संग्रामनगर उड्डाणपूल ते बीड बायपास-गोदावरी टी या मार्गावरील वाहतूक 6 फेब्रुवारीपासून 30 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
देवळाई, सातारा भागातून हजारो नागरिकांची रोज कामानिमित्त शहरात ये-जा
दरम्यान यामुळे शिवाजीनगर रेल्वे गेटची कोंडी वाढणार आहे. देवळाई, सातारा या भागातून हजारो नागरिक रोज कामानिमित्त शहरात ये-जा करतात. शिवाजीनगर रेल्वे गेटवर सतत वाहतूक कोंडी झालेली असते. तासनतास वाहनचालकांना या कोंडीत अडकून राहावे लागते. आता संग्रामनगर उड्डाणपूल बंद झाल्याने या वाहतुकीचा ताणदेखील शिवाजीनगर रेल्वे गेट रस्त्यावर पडणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे गेट येथे होणारी वाहतूक कोंडी आणखी वाढून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे बीड बायपासच्या पलीकडे सातारा, देवळाई भागात सुमारे 80 हजारपेक्षा अधिक लोक राहत असून, त्यांना याचा फटका बसणार आहे.
वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग
- देवळाई चौक सूतगिरणी चौक मार्गे शहानूरमियाँ दर्गा चौक.
- बीड बायपास रोडवरील हॉटेल रॉन्द-व्हू शेजारून संग्रामनगरजवळील भुयारी मार्गाने दर्गा चौक.
- बीड बायपास रोडवरील महूनगर टी पॉइंट-उस्मानपुरा मार्गे शहानूरमियाँ दर्गा चौक
- महानुभाव आश्रम- रेल्वे स्टेशन चौक- हॉटेल विट्स चौक मार्गे उस्मानपुरा.
इतर महत्वाच्या बातम्या:
जी-20! विदेशी पाहुण्यांच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेकडून मॉकड्रिल; खुद्द आयुक्तांचा सहभाग