Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात ठाणे पोलीस देखील कामाला लागले आहेत. भाईंदरच्या कार्यालयाशी संबंधित तिघांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे : टोरेस घोटाळा प्रकरणी एकीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली आहे. भाईंदरमधील टोरेस कार्यालयाशी संबंधित तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या तिघांना पोलीस स्टेशनला हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अजूनही छापेमारी सुरु असल्याचं पाहायला मिळतं.
भाईंदर कार्यालयातील तिघांना अटक
भाईंदर येथील टोरेस कार्यालयात काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि ऑफिस भाड्याने जिच्या नावावर घेतले होते त्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी अटक करुन त्यांना ठाणे कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी लक्ष्मी सुरेश यादव वय वर्ष 23, राहणार ताडदेव फिश मार्केट, नितीन रमेश लखवानी वय वर्ष 47, राहणार खारोडी मालाड आणि मोहम्मद मोईजुद्दीन नझरुद्दीन खालिद शेख वय वर्ष 50, राहणार पूनम सागर मीरा रोड या तिघांना नवघर पोलिसानी अटक केली आहे.
टोरेसनं गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये दादरमध्ये पहिलं कार्यालय उघडलं होतं. त्यानंतर , गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड मध्ये देखील कार्यालयं उघडली होती.
टोरेस प्रकरणात छापेमारी सुरु
टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणात पोलिसांचा अजून देखील छापेमारी सुरु आहे. मागील तीन दिवस छापेमारी सुरु असून मुंबईतील सर्व दुकानांमधील मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत. याआधी केलेल्या छापेमारी मध्ये पोलिसांना या दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने तसेच 5 कोटी रुपये देखील मिळाल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली.आज आर्थिक गुन्हे शाखेकडून टॉरेस कार्यालयातील मुद्देमाल वस्तूंची जप्ती सुरू आहे.
टोरेस प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. ज्यांनी झटपट श्रीमंतीच्या मोहापायी टोरेसमध्ये पैसे गुंतवले त्यांच्याकडून आता तक्रारी केल्या जात आहेत. सोमवारी दादरच्या टोरेसच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार जमल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. टोरेसच्या कार्यालयात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देखील दिला गेला नव्हता. त्यावरुन देखील वाद झाला होता, अशी माहिती आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस घोटाळा प्रकरणी तीन बँक खाती सील केली आहेत. टोरेस घोटाळाप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशननं सुरुवातीला सर्वेश सुर्वे,तानिया कसातोव्हा,वॅलेंटिना कुमार या तिघांना अटक केलेली आहे.
इतर बातम्या :