(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: खासदार फौजिया खान यांच्या घरी चोरी; पोलिसांकडून तपास सुरु
Aurangabad: याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तसेच राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांच्या औरंगाबाद येथील घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चक्क खासदार यांच्याच घरी चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे. फौजिया खान यांचे औरंगाबाद शहरातील एन-13 मधील चाऊस कॉलनीमध्ये घर असून, 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात चोरी केली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहेसीन अहेमद खान (वय 65 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात शहरातील एन-13 मधील चाऊस कॉलनीतील फौजिया खान यांच्या घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी प्रवेश केला. त्यानंतर घराच्या पाठीमागील दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर घरातील जर्मनचे पाच जुने भांडे ज्यांची किमंत 3 हजार रुपये हे चोरून नेले आहे. त्यामुळे याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात खळबळ...
दिवाळी सणाच्या काळात अनेकजण गावाकडे जातात, त्यामुळे बंद घरात चोरीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ पाहायला मिळत असते. त्यामुळे या काळात पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. मात्र औरंगाबादमध्ये चोरट्यांनी चक्क खासदार यांच्या घरालाच लक्ष करून, पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे आता जर खासदार यांचेच घर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांचा वचक होतोय कमी?
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. शहरात तरुण मुलांमध्ये नशेचे प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे बाहेर राज्यातून औरंगाबादमध्ये नशेसाठी लागणाऱ्या गोळ्या, ड्रग्स येत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यातच शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील तरुणांना नशेसाठी लागणारे ड्रग्स पुरवणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांचे वचक पहिल्यासारखं राहिले नसल्याची चर्चा सर्वसामन्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या...