चीनच्या दूतावासातील अधिकाऱ्यांची बस पोलिसांनी रोखली; पर्यटकांनी औरंगाबाद शहरात यायचे की नाही?
Aurangabad News: अशा कारवाया केल्या जात असतील पर्यटक शहरात कसे येतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Aurangabad News : ऐतिहासिक शहर म्हणून असलेल्या औरंगाबाद शहरात रोज देश-विदेशातील पर्यटक येत असतात. मात्र सध्या पोलिसांकडून टुरिस्ट बसवर होणाऱ्या कारवायांवरुन पर्यटकांनी औरंगाबाद शहरात यायचे की नाही? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. जालना रोडवर खासगी प्रवासी बसला सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रतिबंध आहे. मात्र त्याअडून टुरिस्ट बसला 'नो एंट्री'च्या नावाखाली रोखण्याचा प्रकार होत आहे. दोन दिवसांपूर्वी चीनच्या दूतावासातील अधिकारी असलेली बस रोखण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (31 जानेवारी) परदेशी पाहुणे असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याबाबत लोकमतने वृत्त दिले आहे. त्यामुळे अशा कारवाया केल्या जात असतील पर्यटक शहरात कसे येतील आणि त्यांना होणारा त्रास यावरुन जगभरात काय संदेश जाईल असा प्रश्न असा सवाल टुरिस्ट बसचालकांनी उपस्थित केला.
भरधाव वाहने आणि वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी बसला रात्री 11 वाजेनंतरच औरंगाबाद शहरातील जालना रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. पुढे यात बदल करुन, प्रवेशाची ही वेळ रात्री 10 ते सकाळी 8 अशी करण्यात आली. दरम्यान या सगळ्यात दिवसा जालना रोडवरुन देश-विदेशातील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या टुरिस्ट बस वाहतूक पोलिसांकडून रोखण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनच्या दूतावासातील अधिकारी असलेली बस तासभर थांबवण्यात आली. मंगळवारी परदेशी नागरिक असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे टुरिस्ट बसचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पर्यटकांची संख्या वाढणार कशी?
दरम्यान या बसमध्ये चीनच्या दूतावासातील लोक होते, परंतु बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमित ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट बसमध्ये फरक आहे. दिवसा जर टुरिस्ट बस येऊ द्यायची नाही म्हटली, तर पर्यटकांची संख्या वाढणार कशी, असा सवाल आहे. टुरिस्ट बसला शहरात कधीही प्रवेश मिळावा, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी दिली आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया...
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे म्हणाले की, दिवसा शहरात प्रवेश करण्यासाठी ट्रॅव्हल्स बससंदर्भात काही नियमावली आहे. त्या नियमानुसार वाहतूक पोलिस कारवाई करतात. दिवसा ज्या ट्रॅव्हल्स बसला शहरात प्रवेशाची परवानगी आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. ज्यांना परवानगी नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. हा नियम सर्व ट्रॅव्हल्स बसला लागू असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या;
औरंगाबाद महानगरपालिकेचा कारवाईचा धडाका सुरूच; आज पुन्हा 30 अनधिकृत बांधकामे पाडली