(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: आमदार बंब यांच्या विरोधात काढलेल्या शिक्षकांच्या मोर्च्याला सुरवात; या आहेत प्रमुख मागण्या
Aurangabad : औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर हा भव्य मोर्चा जाऊन धडकणार आहे.
Aurangabad News: शिक्षक-पदवीधर आमदारांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्याला औरंगाबादमध्ये सुरवात झाली आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मुद्दा उपस्थित करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याच मागणीच्या विरोधात आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला असून, त्याची प्रत्यक्षात सुरवात झाली आहे.
मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आज सकाळपासूनच औरंगाबादसह इतर जिल्ह्यातील शिक्षकांनी शहरात हजेरी लावली. सकाळी अकरा वाजेपासूनच शहरातील आमखास मैदानात शिक्षकांनी जमण्यास सुरवात केली होती. त्यानंतर आता मोर्चा आमखास मैदानातून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडे निघाला आहे. यावेळी मोर्चेकरी शिक्षकांनी डोक्यावर वेगवेगळ्या घोषणाबाजी करणाऱ्या टोप्या घातल्या आहेत.
या आहेत मागण्या...
- शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका
- सरकारी शाळा भौगोलिक दृष्ट्या सुसज्य करा
- शासकीय निवासस्थाने बांधून द्या किंवा मुख्यालय राहण्याची अट रद्द करा.
- शिक्षकांबाबतचे अन्यायकारक धोरणे रद्द करा
- सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावेत.
- विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता वाढवण्यात यावा.
- शिक्षक आणि शिक्षण विभागातील सर्व रिक्त पद भरण्यात यावे.
- 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन देण्यात यावी.
- वस्तीशाळा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा.
शाळांचे खाजगीकरण करण्यासाठी धडपड...
शिक्षकांनी काढलेल्या मोर्च्याबाबत प्रतिक्रिया देतांना आमदार कपिल पाटील म्हणाले आहेत की, प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या प्रश्नात नाक खूपसू नये. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे पाहावं. जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्यासाठी हा सगळा घाट असून, त्याचीच ही सुरवात असल्याचा आरोपही कपिल पाटील यांनी केला आहे.