Raosaheb Danve: 'हे तर ठाकरे सरकारचं पाप'; याकूब मेमन प्रकरणी दानवेंची खोचक टीका
Terrorist Yakub Memon grave: याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणे म्हणजेच मागच्या सरकारचे पाप असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.
Terrorist Yakub Memon grave: दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. तर यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुद्धा होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरूनच राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणे म्हणजेच मागच्या सरकारचे पाप असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. सोबतच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, गेल्या दोन-अडीच वर्षात राज्यात अशा काही ज्या घटना घडल्यात त्या घटनांकडे आपण बघितले पाहिजे. ज्यावेळी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ धरली तेव्हा अशाप्रकारे जे काही प्रकार राज्यात घडले त्याला पूर्णपणे शिवसेनेने समर्थन केले. औरंगाबाद जिल्ह्यात जी औरंगजेबची कबर आहे, त्याला पोलीस संरक्षण देण्याचं काम यांनी केलं होतं. आमचा कोणत्याही माणसाला किंवा व्यक्तीला विरोध नाही. पण ज्यांनी अन्याय अत्याचार केले, ज्यांनी हिंसा घडवली असेल त्यांना आमचा विरोध असेल असे दानवे म्हणाले.
तर याकुब मेमन सारख्या माणसाने मुंबईत बॉम्बस्फोट घडवला, अनेक लोकं त्यात मारले गेलेत. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर भारत सरकराने त्याच्या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना मृतदेह घेऊन जाण्याचे सांगितले होते. पण पाकिस्तानने तो आमचा असल्याचा हक्क दाखवला नाही. मेमन एवढा बेवारस माणूस असून, त्याला कुणीही स्वीकारण्यास तयार नाही. अशा व्यक्तीची कबर सजवणं हे मागच्या सरकारच्या काळातील पाप आहे. मग ते औरंगजेबच्या कबरीला पोलीस संरक्षण देणं असो की, मेमनच्या कबरीला सजवणे असो या ज्या शक्ती वरती डोकं काढत आहे त्यांना राज्याची जनता नक्कीच उत्तर देतील असेही दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी राज्याची माफी मागावी...
उद्धव ठाकरे यांनी फक्त आमचीच माफी मागू नयेत तर त्यांनी या संपर्ण राज्याची माफी मागितली पाहिजे. विचारांना तिलांजली देऊन वेगळ्या विचाराने वागत असाल आणि तुमच्या काळात अशा अन्याय-अत्याचार करणाऱ्या लोकांच्या कबरी सरकारच्या मदतीने सजवल्या जात असतील तर नक्कीच उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातमी...