(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 9 व्यक्तींचा बळी; खासदार जलील हे मात्र दुबईत
Aurangabad Rain News: औरंगाबाद जिल्ह्यातील 35 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Aurangabad Rain News: मराठवाड्यातील अनेक भागात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीत 9 व्यक्तींचा बळी गेला आहे. मात्र असे असतांना जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील दुबईत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात आजही गुडघ्याएवढं पाणी साचले असतांना, त्यांना मदतीची गरज आहे. मात्र मदत सोडा साधी सहानभूती सुद्धा लोकप्रतिनिधीकडून
बळीराजाला मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून पंचनामे केले जात नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रशासनाला सूचना करने अपेक्षित आहे. मात्र असे असतांना खासदार जलील यांनी एकही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली नसल्याचे आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जलील सद्या दुबई दौऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जिल्ह्यातील 35 गावांना सतर्कतेचा इशारा
दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात पावसाळ्यात सुरवातीलाच जोरदार पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यात तर जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 35 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर वैजापूरच्या शिंदे वस्तीला पाण्याने वेढा घातला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी गावात जाऊन स्वतः पाहणी केली आहे. मात्र असे असताना जिल्ह्याच्या खासदारांना वेळ नसावा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेतेमंडळी बांधावर कधी जाणार?
राज्यातील राजकीय घडामोडी पाहता अनेक आमदार सद्या मुंबईत ठाण मांडून आहे. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. एकट्या मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 35 लोकांचा जीव गेला आहे. घरांची पडझड झाली आहे. पण त्यांना आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात अशाच एका आमदाराला शेतकऱ्यांनी घेराव घालत जवाब विचारल्याचे समोर आले आहे.