Aurangabad Measles Updates: गोवरने औरंगाबादकरांची चिंता वाढवली, संशयित रुग्णांचा आकडा 'शंभरीपार'
Aurangabad Measles Updates: शहरात गोवरचा फैलाव झपाट्याने वाढतो आहे. तर पालकांची चिंता वाढली आहे.
Aurangabad Measles Updates: मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या गोवर आजाराने आता औरंगाबादकरांची चिंता वाढवली आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) गोवर संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. रविवारी शहरातील आकडा शंभरीपार गेला असून, संशयित बालकांची संख्या आता 105 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे शहरात गोवरचा फैलाव झपाट्याने वाढतो आहे. तर पालकांची चिंता वाढली आहे.
रविवारी औरंगाबाद शहरातील गोवर संशयित रुग्णांच्या संख्येने शंभरचा आकडा ओलांडला आहे. शनिवारपर्यंत शहरात 99 संशयित रुग्ण आढळून आले होते. रविवारी त्यात आणखी 6 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण आकडा आता 105 वर गेला आहे. तर गोवरचे रुग्ण आढळून आलेल्या भागात सोमवारी अतिरिक्त नऊ लसीकरण शिबिरे भरविण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दोन दिवसांत एकही पॉझिटिव्ह नाही...
मुंबई, भिवंडीपाठोपाठ औरंगाबाद शहरातही गोवर साथीचा उद्रेक वाढतो आहे. चिकलठाणा, नेहरूनगर, बायजीपुरा, विजयनगर, गांधीनगर, नक्षत्रवाडी, नारेगाव, मिसारवाडी, भीमनगर, सातारा, बन्सीलालनगर, भवानीनगर, जयभवानीनगर या भागात संशयित रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारपर्यंत संशयित बालकांची संख्या 99 असतांना रविवारी हा आकडा 105 वर पोहचला आहे. मात्र मागील दोन दिवसांत एकाही बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही.
लसीकरण शिबीर घेण्यावर भर...
शहरातील गोवरची परिस्थिती पाहता आरोग्य विभाग अलर्ट झाली आहे. तर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करत आहे. त्यातच रविवारी आणखी सहा संशयित बालके आढळून आले आहेत. तसेच गोवर साथीला नियंत्रणात आणण्यासाठी उद्या सोमवारी चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, नक्षत्रवाडी या भागात प्रत्येकी दोन तर भवानीनगरात एक या प्रमाणे लसीकरण शिबीर घेतले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
ग्रामीण भागात देखील फैलाव...
गोवर आजाराने औरंगाबाद शहरात धुमाकूळ घातला असल्याने महानगरपालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र याचवेळी गोवरचा फैलाव आता ग्रामीण भागात देखील पाहायला मिळत आहे. कारण वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील एका नऊ महिन्यांच्या चिमुकला आणि चिकटगाव येथील दोन वर्षीय बालक संशयीत आढळले आहे. त्यामुळे या दोघांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यामुळे आता त्यांच्या अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. तर महानगरपालिकाप्रमाणे ग्रामीण भागातील आरोग्य विभाग देखील अलर्ट झाले आहेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )