(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: जायकवाडीतून पाणी सोडण्याबाबत सिंचन समितीची बैठक; आज ठरणार...
Jayakwadi: या बैठकीत मुख्य अभियंता आणि जायकवाडी प्रकल्पाच्या अभियंत्यांची उपस्थिती असणार आहे.
Aurangabad: जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत आज सिंचन समितीची बैठक होणार असून, त्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय होणार आहे. तर धरणाची पाणी पातळी 83 टक्क्यांवर गेल्यावर धरणातून विसर्ग केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माध्यमांना दिली आहे. सद्या धरणात 80.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज सिंचन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्य अभियंता आणि जायकवाडी प्रकल्पाच्या अभियंत्यांची उपस्थिती असणार आहे. सोबतच कडा आणि पाटबंधारे विभागाशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे. त्यांनतर जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 80.57 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा 35.48 टक्क्यांवर होता. धरणात अजूनही 30 हजार 341 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1749.177 दलघमी आहे.
उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय...
जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पाहता काल रात्री जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यांनतर आज सकाळी 11 वाजता उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा लक्षात घेता आणि धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.
गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास याचा फटका गोदाकाठच्या गावांना बसण्याची शक्यता आहे. गोदावरीला पूर आल्यास मराठवाड्यातील 1522 गावांना याचा फटका बसतो. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच नदी पात्रात असलेल्या आपल्या वस्तू काढून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच पाणी सोडल्यावर कुणीही नदी पात्रात उतरू नयेत असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.