Aurangabad : औरंगाबादमध्ये रोड रोमिओंच्या उच्छादाने नागरिक त्रस्त, पोलिसांची भीतीच उरली नाही
Aurangabad Crime News: नागरिकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, कारवाईची मागणी देखील केली आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात (Aurangabad City) गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना पाहता शहरात पोलिसांचा धाक उरलाच नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. आता अशातच रोड रोमिओंच्या राड्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात हे तरुण हातात दगड घेऊन परिसरात राडा घालतांना पाहायला मिळत आहे. नागरिकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, कारवाईची मागणी देखील केली आहे.
औरंगाबादच्या वाळूज महानगर परिसरातील बजाजनगरमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस करून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांचे रस्त्यावर राजरोसपणे वादविवाद होत असल्याने परिसरात नागरिक त्रस्त झाले आहेत. या घटनांमुळे बजाजनगर परिसरातील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस कोचिंग क्लासेस सुटल्यानंतर हे रोड रोडरोमिओ रस्त्यावर धूम स्टाईलने वावरत असल्याने कोचिंग क्लासेस करून घरी परतणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या परिसरातील रोडवर पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावर धिंगाणा आणि शिवीगाळ...
रोजच्या या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ केला आहे. ज्यात दोन तरुणांमध्ये रस्त्यावरच भांडण होतांना पाहायला मिळत आहे. तर जोरजोरात ओरडत हे तरुण शिवीगाळ करतांना यावेळी पाहायला मिळत आहे. तर यातील एक तरुण हातात भला मोठा दगड घेऊन दुसऱ्याच्या अंगावर धावून जातांना दिसत आहे. याचवेळी तेथून काही मुली जातांना दिसत आहे. मात्र असे असतांना दोन गटात होणारे भांडण आणि शिवीगाळ सुरूच होती. त्यामुळे या घटनांनी परिसरातील महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. तर याकडे पोलिसांनी लक्ष देऊन अशा तरुणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांची मागणी...
याबाबत प्रतिक्रिया देतांना स्थानिक महिला म्हणाल्या की, या परिसरात अनेक रोडरोमिओ रात्रीच्या वेळेस फिरत असतात. त्यांच्यात जोरात वाद होत असतात. जोरजोरात शिवीगाळ करतांना त्यांच्या हातात मोठ-मोठे दगड असतात. तसेच त्यांच्यात हाणामारी देखील होतांना पाहायला मिळते. आमचा रहिवासी परिसर असून, देखील अशाप्रकारे रोड रोमिओंच्या उच्छाद नेहमी पाहायला मिळत असतो. अनेकदा आमची लहान मुलं रस्त्यावर खेळतात, त्यामुळे त्यांच्या वादात मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.
संतापजनक! 50 वर्षीय महिलेवर 55 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल