मराठवाड्यात आचारसंहिता लागू! शिक्षक मतदारसंघासाठी 30 जानेवारीला मतदान
Election: मतदान 30 जानेवारी पार पडणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अखेर घोषणा झाली असून, मराठवाड्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी 12 जानेवारीपासून भरता येणार आहे. तर मतदान 30 जानेवारी पार पडणार आहे. तसेच मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. विद्यमान आमदार विक्रम काळे यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीपर्यंत असल्याने तत्पूर्वी निवडणुक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन आमदार निवडण्यात येणार आहे. 5 जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना जरी करण्यात येणार आहे. 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 13 जानेवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 16 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तसेच 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादी विरुद्ध भाजपची थेट लढत
राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार विक्रम काळे रिंगणात असणार आहे. तर महाविकास आघाडी असल्याने ठाकरे गट किंवा काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता कमी आहे. तर काळे यांच्या विरोधात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले किरण पाटील जाधव मैदानात असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत होणार आहे. तर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 1 नोव्हेंबर 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षांतील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक मतदार नोंदणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.
बंब यांच्या भूमिकेचा भाजप उमेदवाराला फटका बसणार?
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याच्या मुद्दा उपस्थित करून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली होती. तर शिक्षकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन देखील केले होते. विशेष म्हणजे शिक्षक मतदारसंघच रद्द करण्याची मागणी बंब यांनी केली होती. त्यामुळे मतदारांची मनधरणी करण्यासाठी आता भाजप उमेदवाराला चांगलीच कसरत करावी लागणार असल्याची चर्चा आहे.
आगामी वर्षाची पहिली निवडणूक...
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने वर्षाचा शेवट होत आहे. तर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद सारख्या महत्वाच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याच्या शक्यता आहे. पण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने 2023 वर्षाची सुरवात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर महाविकास आघाडी की युतीचा उमेदवार या निवडणुकीत बाजी मारणार हे पाहणं देखील तेवढच महत्वाचे असणार आहे.