मुख्यमंत्र्यांना गावात आणण्यासाठी त्यानं केलं असं काही, स्वतः शिंदेंही नकार देऊ शकले नाही
Aurangabad: अखेर हतबल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ताफा फिरवला.
Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाची जवाबदारी घेतल्यापासून ते अनेक दौरे करत आहे. या दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जाते,पण अनेकदा दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी थांबणे शक्य होत नाही. मात्र औरंगाबादच्या दौऱ्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावरच लोळण घातलं एका कार्यकर्त्याने त्यांना आपल्या गावात घेऊन गेल्याचं समोर आले आहे. विशेष म्हणजे कार्यकर्ता काहीच आयकायला तयारच नसल्याने अखेर हतबल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ताफा फिरवत गावात हजेरी लावली.
औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणची सभा आटपून आपेगावकडे निघाले होते. त्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेणार असल्याचा उल्लेख होता. त्यामुळे गावकऱ्यांनी जय्यत तयारी सुद्धा केली होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री यांनी गावात जाण्याचे नाकारले आणि पुढे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या बंगल्यावर भोजनासाठी पोहचले.
तुम्हाला यावंच लागतंय...
मुख्यमंत्री आपल्या गावात येत नसल्याची माहिती मिळताच आपेगावातील शिंदे समर्थक असेलला शिवाजीराव दिवटे नावाचा कार्यकर्ता थेट भुमरे यांच्यावर बंगल्यावर जाऊन धडकला. त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि 'तुम्ही आपेगावला येण्याचे कबूल केलं होतं, आता तुम्हाला यावंच लागतंय,' अशी विनंती केली.
मुख्यमंत्र्यांचं एक पाऊल मागे...
दिवटे यांनी गावात येण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. पण कार्यकर्ता निर्धार करून आला होता, त्यामुळे माघे हटण्याचा विषयच नव्हता. त्याने थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पायावरच लोळण घेतली. आता तुम्ही जोपर्यंत 'चलतो', असं म्हणणार नाही तोपर्यंत पाय सोडतच नाही, असं त्यानं बजावलं. याचवेळी आपल्या कार्यकर्त्याच्या मागणीला भुमरेंनीही हळूच पाठिंबा दिला. मग काय हतबल झालेल्या मुख्यमंत्री यांनी आपेगावत येण्याचं कबूल, करत पुन्हा ताफा आपेगावाच्या दिशेने वळवला.
अन् गावकऱ्यांचा जल्लोष...
मुख्यमंत्री आपल्या गावात येणार असल्याने आपेगावातील गावकऱ्यांनी मोठी तयारी केली होती. ठिकठिकाणी मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी भला मोठा हार तयार करण्यात आला होता. यापूर्वी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना गावात आले होते. त्यामुळे दुसऱ्यांदा आपल्या गावात मुख्यमंत्री येत असल्याचा वेगळा आनंद गावकऱ्यांमध्ये होता. त्यामुळे काहीही झालं तरी मुख्यमंत्री आपल्या गावात आलेच पाहिजे असा निर्धार करून गेलेल्या शिवाजीराव दिवटे यांनी मुख्यमंत्र्यांना गावात आणून अखेर मोहीम फत्ते केलीच. मुख्यमंत्री गावात आल्यावर गावकऱ्यांनी मोठा जल्लोष करत त्यांचे स्वागत केले.
महत्वाच्या बातम्या...
CM Eknath Shinde: 'या' दहा कारणांमुळे गाजला मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा