(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: पोलिसांची दुचाकी चोरांविरोधात मोठी कारवाई; गुन्ह्यातील 6 मोटारसायकल जप्त
Aurangabad Crime News: पोलिसांकडून एकुण 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांच्या सिटी चौक पोलिसांनी दुचाकी चोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी यावेळी चोरीच्या एकूण 6 मोटारसायकल चोरट्यांच्या ताब्यातून जप्त केल्या असून, दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सोहेल अफरोज पटेल (वय 22 वर्ष रा. इंदिरानगर बायजीपुरा औरंगाबाद), शेख वाजेद शेख आरेफ (वय 24 वर्ष रा. गुलशननगर ता. सिल्लोड, औरंगाबाद) असे दुचाकी चोरणाऱ्या आरोपींचे नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोपेड चोरीचा तपास करत असतांना सोहेल पटेल आणि वाजेद शेख यांनी ती चोरली असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी दोघांना ही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी इतरही मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. ज्यात औरंगाबाद शहरातुन प्रोझोन मॉल, शहागंज, सावरकर चौक सिडको, साखरे मंगल कार्यालय समोरुन, हर्सूल टी पॉईंट, सेव्हन हिल या ठिकाणाहून विविध कंपन्याच्या मोटार सायकल चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे. या दोन्ही आरोपींच्या ताब्यातुन हिरो एच.एफ.डिलक्स, सिडी डिलक्स, हिरो स्पेलन्डर, होंडा शाईन अशा एकुण 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे.
दुसऱ्या कारवाईत मोबाईल चोर ताब्यात
क्रांतीचौक पोलिसांनी मोठी कारवाई करत एका मोबाईल चोराला ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 14 मोबाईल जप्त केले आहे. शटर फोडुन मोबाईल चोरणाऱ्या एका व्यक्ती बाबत पोलीस निरिक्षक जी. एच. दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. चोरीस गेलेले मोबाईल विकण्यासाठी हा व्यक्ती संजयनगर बायजीपुरा येथे येणार असल्याची माहीती त्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकाला संजयनगर, बायजीपुरा भागात पाठवत सापळा रचला.
Crime News: 'भावांनो माझा दहावा करू नका...'; चिठ्ठी लिहून संपवलं जीवन
यावेळी एक संशियत व्यक्ती संजयनगर येथे चोरीचे मोबाईल विक्री करतांना मिळून आला. त्यामुळे त्यास तात्काळ ताब्यात घेवुन पोलीसांनी नाव पत्ता विचारले असता त्याने, त्याचे नाव हसन खान कलंदर खान (वय 23 वर्ष रा. अलंकार टॉकीज जवळ कबाडी मोहल्ला, जालना) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याचे कबुल केले. यावेळी त्याने चोरलेल्या मुद्देमालापैक एकुण 1 लाख 34 हजार रुपये किंमतीचे विवीध कंपन्यांचे 14 मोबाईल जप्त करण्यात आले.