Aurangabad Water Issue: तब्बल 227 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले; न्यायालयाने फटकारताच मनपा ॲक्शन मोडमध्ये
Aurangabad : मनपाच्या पथकाने शहरातील झोन 1 अंतर्गत शांतीपुरा येथे मुख्य जलवाहिनीवरील 227 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले आहेत.
Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता खुद्द न्यायालयाने यात लक्ष घातले आहे. दरम्यान शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन का तोडले जात नाही असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे न्यायालयाने फटकारताच औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) आता ॲक्शन मोडमध्ये आली असून, अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपाच्या पथकाने शहरातील झोन 1 अंतर्गत शांतीपुरा येथे मुख्य जलवाहिनीवरील 227 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले आहेत.
मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. दरम्यान सोमवारी शहरातील झोन 1 अंतर्गत शांतीपुरा येथे मुख्य जलवाहिनी वरील 227 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. या मुख्य जलवाहिनीवर अज्ञात नागरिकांनी सुमारे 200 ते 250 अनधिकृत नळ जोडण्या करून जलवाहिनीची अक्षरशःचाळणी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशा 227 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करून, त्या काँक्रीटद्वारे बंद करण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनी पासून सुमारे 500 ते 600 फूट पर्यंत या अनधिकृत नळ जोडण्या करण्यात आल्या होत्या.
जलवाहिनीची अक्षरशःचाळणी...
शांतीपुर भागातील मुख्य जलवाहिनीवर असलेले अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला जलवाहिनीवरील कनेक्शन पाहून धक्काच बसला. कारण अवघ्या चार-पाच इंचच्या अंतरावर एकाबाजूला एक असे कनेक्शन होते. त्यामुळे जलवाहिनीची अक्षरशःचाळणी झाली आहे. त्यामुळे पथकाने नळांचे मोठे जाळे ओढून काढले. त्यानंतर पाईप उखडून काढत मुख्य पाईपलाइनला खुट्या ठोकल्या.
पथक कागदावरच...
मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत कनेक्शन का तोडली जात नाही? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. तसेच दिवाळीपर्यंत तरी तीन दिवसाला पाणीपुरवठा करता येईल का? असा प्रश्न न्यायालयाने मनपाला विचारला होता. त्यामुळे अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी आणखी दोन पथके नियुक्त केले होते. पण ही पथके अजूनही कागदावरच असल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलीस बंदोबस्त मिळताच कारवाई...
यापूर्वी सुद्धा अनेकदा अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने अनेकदा कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र सोमवारी पोलीस बंदोबस्त मिळताच मनपाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.