Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ? जास्त विद्यार्थी, हॉस्टेल दाखवून शिष्यवृत्ती लाटल्याचा आरोप
Aurangabad : शंभरावर शाळांना जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्या असून, संबंधितांकडून जास्त शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Abdul Sattar : शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. टीईटी घोटाळा, महिला खासदारांबद्दल वादग्रस्त विधान, जिल्हाधिकाऱ्यांना दारूची ऑफर, सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी पैसे वसूल केल्याचा आरोप, वाशीम गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर सत्तार यांच्यावर आता आणखी एक नवीन आरोप होत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून जास्त शिष्यवृत्ती लाटणाऱ्या शाळांच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या अनेक शाळांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) अशा शंभरावर शाळांना जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्या असून, संबंधितांकडून जास्त शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा शिक्षणातील टक्का वाढवा यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. 2017 ते 2021 या कालावधीत वाटप केलेल्या शिष्यवृत्तीचे केंद्र सरकारने लेखापरीक्षण केले असता अनेक धक्कादायक बाबी चव्हाट्यावर आल्या. तर काही शाळांनी हॉस्टेल नसतानाही ते असल्याचे दाखविले, तर कोरोना काळात हॉस्टेल बंद असताना ते सुरू असल्याचे दाखवून ही रक्कम लाटली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील अशा शंभरावर शाळांना जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्या असून, संबंधितांकडून जादा शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात अब्दुल सत्तार यांच्या 6 शाळांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सत्तार यांच्या शाळांचाही समावेश
जास्त विद्यार्थी, हॉस्टेल दाखवून शिष्यवृत्ती लाटल्याचा शाळांच्या यादीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थांतील काही शाळांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यात, एन. एम. उर्दू हायस्कूल (अजिंठा), उर्दू हायस्कूल (अंभई), हिंदुस्थान उर्दू प्रा. शाळा (अंभई), नॅशनल उर्दू प्रा. शाळा (घाटनांद्रा), नॅशनल उर्दू हायस्कूल (सिल्लोड), नॅशनल उर्दू प्रा. शाळा (सिल्लोड) या शाळा सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालविल्या जातात. या शाळांनी जादा विद्यार्थी आणि हॉस्टेल दाखवून शिष्यवृत्ती उचलल्याचे आढळून आल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.
शंभरांवर शाळांना नोटीस
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून काही शाळांनी जास्त शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत हॉस्टेल नसतानाही कागदावर हॉस्टेल असल्याचे दाखवून काही शाळांनी अतिरिक्त शिष्यवृत्ती पदरात पाडून घेतली. तर काही महाभागांनी चक्क कोरोना काळात हॉस्टेल सुरू असल्याचे दाखवून शिष्यवृत्ती उचलल्याचे लेखा परीक्षणात आढळून आले. केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून, संबंधितांकडून जास्त शिष्यवृत्तीच्या रकमा वसूल करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना दिले होते. औरंगाबादच्या शिक्षणाधिकारी (योजना) ए. आर. भूमकर यांनी जास्त शिष्यवृत्ती लाटणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील शंभरांवर शाळांना नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या नावाने अधिक वसूल केलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेचा धनाकर्ष तातडीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जमा करण्याचे आदेश भूमकर यांनी दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: