Dasra Melava: छोट्या-मोठ्या एका हजार गाड्यांचा ताफा, असा आहे सत्तारांचा 'दसरा मेळावा प्लॅन'
Aurangabad News: अंदाजे साडेतीन वाजता आम्ही एकूण एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघणार असल्याच सत्तार म्हणाले.
Dasra Melava 2022: उद्या मुंबईत शिवसेनेचा शिवाजीपार्कवर आणि शिंदे गटाचा बीकेसी मैदानात दसरा मेळावा पार पडणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर यासाठीच औरंगाबादमधून शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार नियोजन केले असून, साडेतीनशे एसटीबससह इतर छोट्या-मोठ्या अशा एकूण एक हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. दुपारी तीन वाजता सत्तार कार्यकर्त्यांसह मुंबईकडे निघणार आहे.
एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही एसटी महामंडळाकडे 500 बसची मागणी केली होती. त्यातील आम्हाला साडेतीनशे बस मिळाल्या आहेत. यातील काही बसेस अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातून मागवण्यात आल्या असून, त्या रस्त्यात आहेत. सकाळी 6 वाजेपासून आतापर्यंत 292 बस आम्हाला प्राप्त झाल्या असून, बाकीच्या सुद्धा टप्या-टप्याने येत आहेत. तसेच औरंगाबाद ते मुंबई चालणाऱ्या 80 कोच बसेस सुद्धा बुक करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातून गाड्यांची मागणी खूप होत आहे. आता कुठून आणि कशा त्यांना गाड्या पुरवल्या जातील याचे सकाळपासून नियोजन करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण नियोजन केले जाईल, त्यानंतर अंदाजे साडेतीन वाजता आम्ही एकूण एक हजार गाड्यांच्या ताफ्यासहित मुंबईच्या दिशेने निघणार असल्याच सत्तार म्हणाले.
रस्त्याने होणारी ट्राफिक लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्त, नाशिक पोलीस आयुक्त, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत माझे बोलणे झालं असल्याचं सत्तार म्हणाले आहे. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने आमचा ताफा मुंबईच्या दिशेने जाईल. आज रात्री दोन किंवा अडीच वाजेच्या दरम्यान आम्ही बीकेसी मैदानात आम्ही दाखल होऊ. त्यामुळे एकूण 25 ते 30 हजार नागरिक माझ्या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी पोहचणार असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
मराठवाड्यातून एक लाख लोकं जाणार?
यावेळी पुढे बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यातील इतर शिंदे गटाचे आमदार यांनी कसे नियोजन केले याबाबत मला माहित नाही. पण त्यांच्याकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मराठवाड्यातील अंदाजे एक लाख लोकं जातील असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. तसेच बीकेसी मैदानात सगळी व्यवस्था करण्यात आली असून, अंदाजे चार लाख लोकं त्या ठिकाणी बसू शकतात असाही दावा सत्तार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना मी कोणताही संदेश देणार नाही...
पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, उद्याच्या दसरा मेळाव्याबाबत मी उद्धव ठाकरे यांना कोणताही संदेश देणार नसून, त्यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पावरांनी आधीच संयमाने बोलण्याचा सल्ला दिला आहे. तर दसरा मेळाव्यात दोन्ही नेत्यांच्या भाषणामुळे कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...