(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: पीएफआयचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Aurangabad: या कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad News: पीएफआयच्या सदस्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यात काढलेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पीएफआयचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला होता. तर या कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएफआयच्या विरोधात राज्यभरात मनसे आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. पुण्यात मनसेकडून मोठं आंदोलन सुद्धा करण्यात आले. तर औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पीएफआयचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिवसभर बसवून सायंकाळी फॉर्म भरून कागदपत्रे जमा करून घेत त्यांना सोडून देण्यात आले.
पोलिसांना आधीच माहिती मिळाली...
पीएफआयच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यामुळे पीएफआयच्या कार्यालयाच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसेचे कार्यकर्ते येताच पोलिसांनी त्यांना पीएफआयच्या कार्यालयापर्यंत जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सिडको पोलिसात गुन्हा दाखल केला.
एटीएसच्या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली आहे...
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातून यापूर्वी सुद्धा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणांना अटक करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र आता पुन्हा एकदा देशविरोधात कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआयच्या सदस्यांवर विरोधात कारवाई करण्यात आल्याने औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे.
यांच्यावर करण्यात आली कारवाई...
औरंगाबाद शहरातून एकूण चार जणांना एटीएसने अटक केली आहे. परवेज खान मुजम्मील खान, (वय 26 वर्षे,रा. बायजीपुरा औरंगाबाद), मौलाना इरफान मिल्ली (वय 37 वर्षे, रा. किराडपुरा औरंगाबाद) , सय्यद फैजल सय्यद खलील (वय 28 वर्षे, रा. मेहमूद पुरा औरंगाबाद) शेख नासेर शेख साबेर उर्फ नदवी ( वय 37, रा. बायजीपुरा, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील नासेर शेख हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीएफआय औरंगाबादमध्ये मोठ्याप्रमाणावर सक्रीय असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! मनसे पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये PFI कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
Aurangabad: मुलं चोरीच्या अफवांचे लोण औरंगाबादपर्यंत पोहचले; मेकअप आर्टिस्टला केली मारहाण