Aurangabad: 'अग्निपथ'च्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर; मोदींविरोधात घोषणाबाजी
यावेळी आंदोलकांनी अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी केली. तसेच या योजनेमुळे देशाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता सुद्धा आंदोलकांनी व्यक्त केली.
Aurangabad News: केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आज औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी 'अग्निपथ बेरोजगारी पथ' या आशयाचे होर्डिंग यावेळी आंदोलकांच्या हातात पाहायला मिळाले. तर केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी सुद्धा आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सुद्धा यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अग्निपथ योजनेला देशभरातून होणारा विरोध कायम आहे. तर देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांच्याकडून हिंसक निदर्शनं सुरुच आहेत. आज अग्निपथ योजनेविरोधात 'भारत बंद'ची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून औरंगाबादच्या क्रांती चौकात आज निदर्शने करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 'या केंद्र सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच मोदींच्या विरोधात सुद्धा आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
शहरात पोलीसांचा बंदोबस्त...
औरंगाबाद शहरात काही संघटना किंवा आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनकडून अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता पाहता पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. ज्या-ज्या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे त्याठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग सुरु आहे. तसेच महत्वाच्या चौकात सुद्धा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरातील परीस्थीतीवर लक्ष ठेवून आहे.
'भारत बंद'ची हाक
आज अग्निपथ योजनेविरोधात 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारमधील तरुण आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह देशभरातल पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
इंटरनेट सेवा बंद
अग्निपथ योजनेला होणार विरोध पाहता बिहार प्रशासनही सतर्क झालं आहे. बिहारमध्ये 17 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 18 रोजी काही विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिली होती, यावेळी डाव्यांनी बंदला पाठिंबा दिला होता. यानंतर आज विद्यार्थ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे.