Aurangabad To Delhi: दिल्लीसाठी सकाळच्या सत्रात इंडिगोची विमानसेवा सुरु; प्रवाशांचा वेळ वाचणार
Aurangabad News: पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात औरंगाबादहून 146 प्रवासी दिल्लीला विमानाने गेले आहे.
Aurangabad News: औरंगाबाद ते दिल्ली (Aurangabad To Delhi Flights) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, हैदराबादनंतर आता दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी इंडिगोची विमान सेवा आजपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना सकाळीच विमानाने जाता येणार आहे. विशेष म्हणजे आज सकाळी पहिल्याच दिवशी औरंगाबादहून 146 प्रवासी दिल्लीला विमानाने गेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीला जाण्यासाठी सकाळची विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची मागणी होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेता इंडिगोकडून आज सकाळपासून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी प्रतिसाद देखील चांगला दिला आहे. पहिल्या दिवशी औरंगाबादहून एकूण 146 प्रवासी सकाळच्या विमानाने दिल्लीला गेले आहेत. तर दिल्लीहून सकाळी पहिल्याच दिवशी 52 प्रवासी औरंगाबादला आले आहेत. तर भविष्यात प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
असा असेल वेळापत्रक...
आजपासून सुरू झालेली सकाळची विमानसेवा ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस प्रवाशांना सकाळच्या विमानसेवेचे लाभ घेता येणार आहे. मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी दिल्ली येथून सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी विमान निघेल आणि औरंगाबाद येथे सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. तर सकाळी 10 वाजता औरंगाबादहून विमान दिल्लीला निघणार आहे, अशी माहिती इंडिगो विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
रात्रभर दिल्लीत थांबण्याची गरज नाही...
प्रवाशांची मागणी लक्षात घेत इंडिगोच्या वतीने प्रतिसाद मिळाला आणि आजपासून सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरु झाली आहे. या विमानसेवेमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवास करताना रात्रभर दिल्लीत थांबावे लागत होते. यामुळे खूप वेळ जात होता. परंतु इंडिगोच्या वतीने आजपासून सकाळची विमानसेवा सुरू केल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच दिल्ली ते औरंगाबाद प्रवास सोपा झाला आहे.