Aurangabad Crime News: ट्रक चालकाला आधी गाडीतून उतरवले; त्यांनतर चाकू हल्ला करत संपवले
Crime News: पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आरोपींच्या शोधात तपास सुरु केला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद-पुणे महामार्गावरील ढोरेगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली असून, ट्रक चालकावर चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी गंगापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास नारायण पवार (वय 35, रा. सह्याद्री हाऊसिंग बजाजनगर वाळुंज पंढरपूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास पवार हा ट्रक चालक म्हणून काम करतो. त्यामुळे वाळूज-पुणे असा त्याचा नेहमीचा रूट असायचा. दरम्यान रविवारी विलास हा पुण्याहून औरंगाबादला आयशर घेऊन येत होता. रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो ढोरेगावजवळच्या राधिक हॉटेल जवळ आला असताना दोघांनी त्याची गाडी थांबवली. आधी त्याला गाडी खाली उतरवले, त्यांनतर त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने त्याचावर हल्ला केला. थेट पोटात अधिक जखमा झाल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलीस घटनास्थळी...
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांच्यासह गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तर तपासणीसाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. तर याप्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपासाचे चक्र फिरवत आरोपीला शोधण्यासाठी पथक नेमण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हत्या की लुटमार...
औरंगाबाद-पुणे महामार्गावर सतत ट्रक-आयशर चालत असतात. ज्यात वाळूज एमआयडीसीमधील माल पुण्याला घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. नेहमी वाहतुकीचा मार्ग असल्याने आणि रस्त्यावर वर्दळ असल्याने या रस्त्यावर लुटमारीच्या घटना सहसा घडत नाही. त्यामुळे विलास यांच्या ह्त्यामागे लूटमार की जाणीवपूर्वक केलेला खून आहे, याचा तपास पोलीस घेत आहे.
इतरही महत्वाच्या बातम्या
Aurangabad Crime: मुलांना मोबाईल देतांना काळजी घ्या, अन्यथा बँक खाते होईल रिकामे
Aurangabad Crime: कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 50 जनावरांची सुटका; पोलिसांची कारवाई