Aurangabad Crime: मुलांना मोबाईल देतांना काळजी घ्या, अन्यथा बँक खाते होईल रिकामे
Crime News: पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या मुलाची चौकशी करत त्याचा मोबाईल तपासला असता, सर्व प्रकरण समोर आले.
![Aurangabad Crime: मुलांना मोबाईल देतांना काळजी घ्या, अन्यथा बँक खाते होईल रिकामे maharashtra News Aurangabad Be careful when giving mobiles to children Aurangabad Crime: मुलांना मोबाईल देतांना काळजी घ्या, अन्यथा बँक खाते होईल रिकामे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/956670e29b855f2486dc25ce19f8a2321657116001_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Crime News: कुठलाही ओटीपी (O.T.P.) किंवा बँक खात्याशी संबधीत माहिती कोणालाही दिली नसतांना बँक खात्यातून 2 लाख 49 हजार 491 रूपयांचे व्यवहार परस्पर झाल्याची तक्रार एका महिलेने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र पोलिसांच्या तपासात जे काही समोर आले त्यांनतर तक्रारदार महिलेला धक्काच बसला. कारण तिच्या बँकेतील पैसे मुलाने मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाईन पेड गेममध्ये उडवल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण...
औरंगाबाद ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्यात 18 जून रोजी एक महिला तक्रारदाराने तक्रार दिली होती की, त्यांच्या बँक खात्यातुन 2 लाख 49 हजार 491 रूपयांचे व्यवहार त्यांच्या परस्पर झाले आहेत. तसेच कुठलाही ओटीपी (O.T.P.) किंवा बँक खात्याशी संबधीत माहिती त्यांनी कोणालाही दिली नाही तरी वरील रक्कम खात्यातुन कमी झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सायबर टिमला तक्रारदार यांचे बँक खात्यातुन कपात झालेल्या रक्कमेचा तांत्रिक पध्दतीने तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
पोलिसांनी असा केला तपास...
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सायबर पोलीसांना तक्रारदार महिलेच्या बँक खात्यातुन जून 2021 पासुन 400, 800, 4000 अशा स्वरूपात रक्कम कमी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम ऑनलाईन गेमींग ॲपसाठी वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत, तक्रारदार महिलेच्या मुलाकडे याबाबत अधीक चौकशी केली. त्याने सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तरे दिली. परंतु त्याला विश्वासात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता, तो आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ऑनलाईन पेड गेम खेळत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ऑनलाईन गेम डाऊनलोड केल्यानंतर त्याचे पेमेंट करण्यासाठी तक्रारदार यांचा यु.पी.आय.आय.डी.ला संलग्न होता. तक्रारदार यांचा मोबाईल क्रमांक हा गेमच्या ऑथिटिक्शेन मध्ये दिल्याने रक्कम ही गेमच्या स्टेज प्रमाणे बँक खात्यातुन मागील एक वर्षात कपात झाली होती.
पालकांनी अशी घ्यावी काळजी...
या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, पालकांनी आपली मुले वापरत असलेल्या मोबाईल मध्ये कोणता गेम खेळत आहेत किंवा त्याचा वापर कश्या पध्दतीने, कशासाठी करत आहेत यांचा बारकाईने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्यांचा यु.पी.आय. आय.डी. ला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक त्याचा पासवर्ड हा मुलाशी शेअर करू नये. सोबतच मुलांच्या मोबाईलमध्ये पॅरेंटस मोड ऍ़क्टीव्ह केला पाहिजे तसेच वेळोवेळी मोबाईलमधील इंटरनेट वापराबाबतची हिस्ट्री चेक करावी, असे आवाहन पोलिसांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)