Aurangabad: खऱ्या नोटांच्या बदल्यात चारपट बनावट नोटा देणार होते, पण संशय आला आणि...
Aurangabad Crime News: पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या खूलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील एका व्यावसायीकास पैसे चौपट करुन देण्याचे आमीष दाखवून फसवणुक करणारी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. 10 लाखांच्या बदल्यात तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा देण्याचं ठरलं असतांना पैसे घेणाऱ्या व्यावसायीकास संशय आला आणि त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर लगेचच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून, आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन विक्री खरेदी करणारे व्यावसायिक मोहमंद अलीयोद्दीन अहेमद सादीकअली (वय 45 वर्षे, रा. रोशनगेट, औरंगाबाद) यांची किशोर फतफुरे व दिलीप मंजुळकर यांच्यासोबत एका जमीनीच्या खरेदी विक्री व्यवहरातुन ओळख झाली होती. दरम्यान किशोर फतफुरे याने मोहमंद अलीयोद्दीन यांना आपल्याकडे चलनात चालण्यासारख्या बनावट चलनी नोटा असुन त्या बँकेत देखील चालतात असे सांगितले. त्यामुळे तुम्ही जर मला दहा लाख रुपये दिले तर मी त्याबदल्यात चौपट चाळीस लाख रुपयाच्या बनावट नोटा तुम्हाला मिळवुन देतो असे म्हंटले.
पोलिसांनी सापळा लावून रंगेहात पकडले...
सुरवातीला मोहमंद अलीयोद्दीन यांनी टाळाटाळ केली, परंतु किशोर फतपुरे व दिलीप मंजुळकर यांनी त्यांच्याकडे वारंवार तगादा लावल्याने मोहमंद अलीयोद्दीन यांना संशय आल्याने त्यांनी पोलीसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावला. त्यानुसार आरोपींनी सांगितल्याप्रमाणे खुलताबाद परिसरातील एका हॉटेलवर बाहेर मोहमंद अलीयोद्दीन दहा लाख रुपये घेऊन पोहचले. काही वेळातच किशोर फतपुरे व दिलीप मजुंळकर हे त्यांच्या इतर सहा साथीदारासह हॉटेल बाहेर आले. मोहमंद अलीयोद्दीन यांच्या हातातील दहा लाख रुपयांची पिशवी घेवून त्यांना बनावट चलनी नोटाची बॅग देवुन ते पुन्हा हॉटेल मध्ये गेले. पैश्याच्या देवाणघेवाण झाल्याची खात्री होताच सापळा लावलेल्या पोलीस पथकाने तात्काळ हॉटेलवर छापा टाकुन आठ ईसमांना पकडले.
बनावट नोटा आल्या आढळून
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोहमंद अलीयोद्दीन यांनी दिलेले पैसे मिळुन आले. त्यांनतर मोहमंद अलीयोद्दीन यांना आरोपींनी दिलेल्या बॅगची पोलिसांनी पाहणी केली असता त्यात पाचशे रुपये दराचे चार मोठे बंडल आढळुन आले. बंडलची पाहणी केली असता त्यामध्ये खाली व वर चलनातील खऱ्या नोटा व आत मध्ये भारतीय बच्चो का बँक असे लिहीलेल्या बनवाट पाचशे रुपये दराचे बनावट नोटा आढळून आल्या.
हे आहेत आरोपी...
किशोर ऊर्फ ईश्वर रामदास फतपुरे (वय 40 वर्षे, रा. घोडेगाव ता. खुलताबाद), प्रकाश ऊर्फ अण्णा लक्ष्मण शिंदे (वय 39 वर्षे, रा. पेनबोरी ता.रिसोड जि.वाशीम), दिलीप दगडु मंजुळकर (वय 45 वर्षे रा.जयगाव ता.रिसोड जि.वाशीम), बाबासाहेब आबाराव आवारे (वय 35वर्षे, रा.घोडेगाव ता.खुलताबाद) अरूण तुकाराम घुसळे (वय 41वर्षे रा.सुलीभंजन ता.खुलताबाद), किशोर गोरख जाधव (वय 36 वर्षे रा.सुलीभंजन ता.खुलताबाद), भैय्यालाल बारीकराव शिकरुपे (वय 52 वर्षे रा.राधास्वामी कॉलनी, जटवाडारोड, औरंगाबाद), सत्यपाल चंद ढोले (वय 35 वर्षे रा.पेनबोरी ता.रिसोड जि.वाशीम)