(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; वाहन अडवून लुटणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या
Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने 7 आरोपींना जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला अडवून लुटणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहे. औरंगाबादच्या गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी जालना जिल्ह्यातील 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर आरोपींकडून 3 लाख 12 हजार 780 रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींना करमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नंदकिशोर श्रीकिसनलाल जैस्वाल (वय 58 वर्ष, रा. रामनगर मुकुंदवाडी, औरंगाबाद) हे देशी दारुच्या दुकानात काम करतात. नेहमीप्रमाणे ते दुकानाची नगदी रोख रक्कम 1 लाख 14 हजार रुपये तसेच, त्यांचे साथीदार मोहन जस्वाल हे 1 लाख 11 हजार रुपये घेऊन ऍक्टीव्हावरून औरंगाबादकडे निघाले होते. यावेळी नंदकिशोर यांनी आपली रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवली होती. दरम्यान रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास लाडगांव टोलनाक्याच्या पुढे उडाणपुलाच्या चढावर पाठीमागुन एका मोटार सायकलवर तिन अनोळखी लोकं आले.
त्यांनी नंदकिशोर यांच्या गाडीला लाथ मारली. लाथ मारल्याने नंदकिशोर आणि त्यांचा साथीदार गाडीसह रस्त्याच्या कडेला जाऊन पडाले. त्यांनतर लाथ मारणाऱ्या दुचाकीवरील तिघांनी त्यांना मारहाण करायला सुरवात केली. तसेच मागून आणखी तीन जन आले त्यांनी सुद्धा मारहाण केली. यावेळी नंदकिशोर यांच्या डोळ्यात काही तिखट पदार्थ टाकला आणि त्यांची ऍक्टिव्हा घेऊन तेथुन निघून गेले. त्यांनतर याप्रकरणी करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जालन्यातून केली अटक...
दरम्यान तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना या गुन्ह्यातील आरोपी जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश शिवाजी मोटरकर, मंगेश प्रकाश मुळे, आकाश ईश्वर कोल्हे, राहूल हरिशचंद्र शिंदे, आकाश उर्फ कॉफी श्रीरंग रणपिसे, अनिकेत अनिल तुपे, चंद्रकांत कमलाकर पाचगे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तर आरोपींकडून 3 लाख 12 हजार 780 रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.