धक्कादायक! पतीसोबत मोबाईलवरून वाद, दोन्ही मुलांना दुधातून विष पाजून संपवलं; स्वतःही विष घेत आत्महत्येचा प्रयत्न
Aurangabad Crime News: पतीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत मोबाईलवरून झालेल्या वादातून महिलेने रागाच्या भरात स्वतःच्या दोन मुलांना दुधातून विष देत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर महिलेची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली असून, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मुदस्सीका हारुण पठाण (वय 9), आयान हारुण पठाण (7) असे मृत मुलांचे नावं असून, मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्यांच्या आईचे नाव मोमीनबी हारुण पठाण (35) असे आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोमीनबी आणि त्यांचे पती हारुण पठाण यांच्यात 29 ऑगस्ट रोजी मोबाईलवरून वाद झाला होता. मोमीनबी यांनी आपल्या माहेरच्या लोकांशी बोलण्यासाठी हारुण पठाण यांना मोबाईल मागितला होता. पण कामात असल्याने हारूण यांनी मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.
मुलांना विष पाजत स्वतः घेतलं...
पतीसोबत झालेल्या वादानंतर मोमीनबी यांनी रागाच्या भरात, उंदीर मारण्याचे विषारी औषध दुकानातून मागवले. त्यानंतर ते औषध दुधात मिसळून दोन्ही मुलांना पाजले आणि स्वतःही पिले. त्यामुळे रात्रीच्या सुमरास मुलांच्या तोंडात फेस येत असल्याने हारूण पठाण यांनी त्यांना सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच मुदस्सीका पठाण आणि आयान पठाण यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर मोमीनबी यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे.
दोन्ही मुलांवर अंत्यसंस्कार...
मुदस्सीका पठाण आणि आयान पठाण यांचा दुर्देवी मृत्यूनंतर गावात शोकाकुल परिस्थिती पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर पठाण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर मृत्यू झालेल्या दोन्ही मुलांवर गावातील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
तरचं नेमका प्रकार समोर येईल
याबाबत पोलिसांनी माहिती देतांना म्हटले आहे की, 29 ऑगस्ट रोजी नेमकं काय झाले होते, याचा तपास केला जात आहे. तसेच मुलांना कुणी विष पाजलं आहे. सोबतच मोमीनबी यांनी स्वतः विष घेतले की, त्यांना कुणी पाजले याचा सुद्धा तपास सुरु आहे. मोमीनबी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे त्यांचा जवाब घेतल्यानंतर नेमका प्रकार समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! मराठवाड्यात 237 दिवसांत 626 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील