Crime News: दुचाकीनंतर आता महागड्या सायकली चोरट्यांच्या निशाण्यावर; औरंगाबादसह नालासोपाऱ्यात दोघांना अटक
Aurangabad Crime News: औरंगाबादसह नालासोपारा पोलिसांनी महागड्या सायकल पळविणाऱ्या एकाला अटक केली आहे.
Aurangabad Crime News: आतापर्यंत दुचाकी आणि चारचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या निशाण्यावर आता महागड्या सायकल असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नालासोपाऱ्यात बी.एम.डब्लू (BMW), जॅग्वार (Jaguar) आणि इतर नामांकित कंपनीच्या सायकली चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असतानाचा, दुसरीकडे औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) देखील महागड्या सायकल पळविणाऱ्या एकाला अटक केली आहे. सोबतच त्याच्याकडून 11 सायकल जप्त केल्या आहेत. चरण कल्याण महाले (वय 29 वर्षे, रा. फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील टीव्ही सेंटर परिसरात मागील चार ते पाच दिवसांत आणि सिडको-हडको परिसरात मागील काही दिवसांपासून महागड्या सायकल चोरीला जात असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांकडून देखील या आरोपीचा शोध घेणं सुरू होते. दरम्यान पोलिसांना एका खबऱ्याकडून चरण महालेकडे अनेक महागड्या सायकल असल्याची माहिती मिळाली होती. तसेच तो यातील सायकल विक्री करण्यासाठी मिसारवाडी, सनी सेंटर भागात येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्याआधारे पोलिसांच्या विशेष पथकाने सनी सेंटर भागात सापळा लावला. त्यात चरण महाले अलगत अडकला. त्याला ताब्यात घेऊन सायकलबाबत विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्यामुळे अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन सिडको ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी खाक्या दाखविताच तो कबूल झाला. टीव्ही सेंटर परिसरात मागील चार ते पाच दिवसांत आणि सिडको-हडको परिसरात मागील काही दिवसांपासून सायकल पळविण्याचा आपण सपाटा लावला होता, अशी कबुली चरण महाले याने दिली.
यापूर्वीही काही गुन्हे दाखल
चरण महाले याने शहरातील महागड्या सायकली चोरी केल्याची कबुली दिली. यादरम्यान, 11 सायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चतरसिंग मौजीराम राजपूत यांच्या तक्रारीवरून सायकल चोरीला गेल्याचा एक गुन्हा सिडको ठाण्यात दाखल असल्याचे स्पष्ट झाले. तर आरोपी चरण महालेविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहेत.
महागड्या सायकल चोरट्यांच्या निशाण्यावर
औरंगाबाद प्रमाणे नालासोपाऱ्यात वाढती सायकली चोरीमुळे नागरीक त्रस्त असतांना पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शहरात सायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने, याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे देण्यात आला होता. दरम्यान तपास करत असतानाच नालासोपारा पूर्वेकडे आचोळे जाणाऱ्या रोडवर राजकुमार मेवाडा नावाचा एक व्यक्ती विवेलो कंपनीची नारंगी काळया रंगाची गिअर असलेली सायकल चालवत असतांना पोलिसांना दिसला. मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे असलेली सायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. तर त्याच्या ताब्यातून पोलिसांनी चोरी गेलेल्या 11 सायकली जप्त केल्या आहेत. यात प्रामुख्याने बी.एम.डब्लू, जॅग्वार या नामांकित कंपनीच्या सायकली होत्या.