Aurangabad: 'ईडी तो बहाना है, भाजप को...';काँग्रेसकडून शहरभरात बॅनरबाजी
Congress Banner In Aurangabad : भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
Aurangabad News: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली असून, त्यांची चौकशी सुद्धा केली जात आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या विरोधात आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये सुद्धा ईडीविरोधात काँग्रेसमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे.
ईडी तो बहाना है भाजप सरकार को अपने घोटाले और नाकामी छुपाना है. या आशयाचे बॅनर शहरभर लावण्यात आले आहे. काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी मोदी सरकारविरोधात शहरभर बॅनर लावले आहे. शहरात सुमारे 250 बॅनर लावण्यात आले आहे. ज्यात जालना रोड, सिडको, हडको, गारखेडा परिसराचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांवर भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप उस्मानी यांनी केला आहे.
काँग्रेसचा आक्रमक चेहरा...
अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचे आक्रमक आंदोलने सहसा पाहायला मिळत नाही. तसेच तसे आक्रमक नेत्यांची यादी सुद्धा खूप कमी आहे. मात्र राहुल गांधींवर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेसचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला आहे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. एवढच नाही तर नेत्यांची आक्रमक अशी आंदोलने सुद्धा होतायत.
राहुल गांधीची आजही चौकशी...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज पुन्हा ईडी कार्यालयात नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी यांची ही चौथ्यांदा ईडीकडून चौकशी होणार आहे. मागील आठवड्यात राहुल गांधींची ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर आज चौथ्यांदा चौकशी होणार आहे. या दरम्यान आजही काँग्रेसकडून निदर्शने होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात झालेल्या चौकशीत ईडीने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती. राहुल गांधी यांना पहिल्या दिवशी 50 प्रश्न, दुसऱ्या दिवशी 36 प्रश्न आणि तिसऱ्या दिवशी साधारण 24 प्रश्न विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यान राहुल गांधी यांच्या चौकशीचे व्हिडिओ रेकोर्डिंग करण्यात आले. त्याशिवाय, त्यांनी दिलेल्या जबावावर ईडी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी घेतली असल्याचे म्हटले जात आहे.