Bacchu Kadu : नवनीत राणांचा ओवेसींना 15 सेकंदांचा इशारा, बच्चू कडू म्हणतात दोघांविरोधात तक्रार देणार, कारण...
Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवार संदिपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर करत असल्याची घोषणा केलीय.
छत्रपती संभाजीनगर : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना उमेदवार संदिपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर केला. तर, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांनी तेलंगाणातील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. 15 सेकंद म्हणणाऱ्या नवनीत राणा आणि 15 मिनिटं म्हणणाऱ्या ओवेंसी विरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
प्रहारचा भुमरेंना पाठिंबा
बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे यांना पाठिबा जाहीर केला आहे.बच्चू कडू यांनी यावेळी ते महायुतीसोबत नसल्याचं म्हटलं. केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू पुढं म्हणाले की ते भाजपसोबत नाहीत आणि भाजपवाले देखील सांगतात की बच्चू कडू आमच्यासोबत नाहीत, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे आमच्यावर ऋण आहेत. त्या आनंदानं कार्यकर्ते काम करत आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.
नवनीत राणा आणि ओवेसी वादात बच्चू कडूंची उडी
भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी तेलंगाणात प्रचार करताना अकबरुद्दीन ओवेसी यांच्या 2013 मधील वक्तव्याला उत्तर देताना “आम्हाला 15 मिनिटे नाही, तर 15 सेकंद लागतील”, असे त्या म्हणाल्या. राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं, “मी तुम्हाला 15 सेकंद नाही, तर 1 तास देतो, तुम्ही काय करू शकता सांगा?” याच वादात आता बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. दोघांची वक्तव्य धार्मिक भावना भडकवणारी आहेत. आम्ही भारताची भूमिका म्हणून बोलत आहोत. हा अखंड भारत तोडण्याचं काम करत असेल त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहू, असं बच्चू कडू म्हणाले.
15 सेकंदाबाबत वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.तर, 15 मिनिटं म्हणणाऱ्या ओवेसींविरुद्द देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. प्रहारच्यावतीनं राणा आणि ओवेसी यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले. नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिलं आहे. देशातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा माझं खुलं आवाहन आहे, असं रवी राणा म्हणाले.
पाहा व्हिडीओ
कोल्हापूरमध्ये शिंदेंच्या उमेदवाराला विरोध, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाठिंबा
बच्चू कडू यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला. तर, कोल्हापूरमध्ये शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला. हातकणंगलेत बच्चू कडू यांनी राजू शेट्टींचा प्रचार केला. आता ते छत्रपती संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अगोदरच संदिपान भुमरेंचं काम करण्यास सुरुवात केली होतं, असं बच्चू कडू म्हणाले.
संबंधित बातम्या :