![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad : कायगावात फौजी सूनबाईचं सासूबाई आणि गावकऱ्यांकडून जंगी स्वागत
पंजाबच्या होशियारपूरमध्ये सुमारे वर्षभर प्रशिक्षण करुन पूजा ज्यावेळी गावात आल्या त्यावेळी गावाच्या सुनेचं सासरच्या मंडळीने गावकऱ्यांसह मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.
![Aurangabad : कायगावात फौजी सूनबाईचं सासूबाई आणि गावकऱ्यांकडून जंगी स्वागत Aurangabad News Mother-in-law and villagers gave a warm welcome to soldier daughter in law in Kaygaon, Sillod Aurangabad : कायगावात फौजी सूनबाईचं सासूबाई आणि गावकऱ्यांकडून जंगी स्वागत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/b0a7ec2efe824400d37a7e76bf4c5542_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील कायगावात फौजी सूनबाईचं सासूबाई आणि गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. सीमा सुरक्षा दलाचं प्रशिक्षण पूर्ण करुन आलेल्या सुनेचं दणक्यात स्वागत झाल्यानंतर सासूने त्यांचं औक्षण केलं. यावेळी कुटुंबासह गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरुन आला होता. गावची सून फौजी झाल्याचा आनंद गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळाला.
सिल्लोड तालुक्यातील कायगावची सून असलेल्या पूजा खरात हिची सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफमध्ये निवड झाली होती. त्या 21 जानेवारी 2021 रोजी प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. पंजाबच्या होशियारपूरमध्ये सुमारे वर्षभर प्रशिक्षण करुन पूजा काल (5 एप्रिल) संध्याकाळी गावात आल्या. यावेळी गावाच्या सुनेचं सासरच्या मंडळीने गावकऱ्यांसह मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात, सजावट करण्यात आली. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केलेल्या स्वागतामुळे पूजा खरात देखील भारावून गेल्या.
पूजा खरात यांनी भारतीय सैन्यात जाव अशी त्यांचे वडील कृष्णा कान्हे याचं स्वप्न होत. वडिलांचं स्वप्न त्यांनी आज पूर्ण केलं. आपल्या मुलीने देशासाठी काहीतरी करावं असं त्यांच्या वडिलांना नेहमी वाटायचं. महत्त्वाचं म्हणजे सासरच्या मंडळींना ही त्याला साथ दिली, पूजा यांना प्रोत्साहन दिलं.वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा पूजा खरात यांनी मनात बाळगली आणि त्या बीएसएफमध्ये भरती झाल्या. आज त्या प्रशिक्षण पूर्ण करुन गावात परतल्यानंतर गावकऱ्यांनीही तेवढ्याच उत्साहाने त्यांचं स्वागत केलं. गावकरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वागत करतील असं वाटलं नव्हतं, परंतु त्यांच्या या स्वागताने मी भारावून गेले आहे, अशी प्रतिक्रिया पूजा यांनी दिली.
दरम्यान पूजा या वैजापूरच्या पालखेड गावातील मूळ रहिवासी आहेत. कायगावच्या उमेश खरात यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला. लवकरच त्या देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर रुजू होणार आहेत. अशाच प्रकारे देशसेवेसाठी पुढे येणाऱ्या महिलांचे स्वागत झालं तर निश्चित सैन्यदलात महिलांचं प्रमाण आणि आत्मविश्वासही वाढेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)