अनुराग कश्यपचं कुणाल कामराला समर्थन, इंडिगो एअरलाईन्सने प्रवास न करण्याचा निर्णय
कुणाल कामराच्या समर्थनार्थ दिग्दर्शक अनुराग कश्यप उतरला आहे. अनुरागने इंडिगो एअरलाईन्सने प्रवास न करण्याच निर्णय घेतला आहे. इंडिगोऐवजी अनुरागने विस्तारा एअरलाईन्सला निवडलं आहे.
मुंबई : इंडिगो एअरलाइन्सने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप कुणाल कामराच्या समर्थनात उतरला आहे. अनुरागने इंडिगो एअरलाईन्सने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रवासासाठी विस्तारा एअरलाईन्सचा वापर करणार असल्याचं म्हटलं आहे. सोमवारी अनुरागने ट्वीट करत ही माहिती दिली.
अनुरागने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "इंडिगो नाही... एअरविस्तारा... मी कुणाल कामराचं समर्थन करतो". अनुराग कश्यप सोमवारी कोलकातामध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी बोलताना त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं. आयोजकांनी माझं इंडिगोचं तिकीट बूक केलं होतं. मात्र कुणाल कामरावर बंदी घातल्यामुळे मी देखील आयोजकांना सांगितलं की, मी इंडिगोने प्रवास करणार नाही. कारण मला असं वाटतं की कुणालवर विनाकारण बंदी घालण्यात आली आहे. मी याप्रकरणी फार काही करू शकत नाही आणि त्याने काही फरकही पडणार नाही. मात्र मला माझी भूमिका मांडायची आहे, म्हणून मी इंडिगो एअरलाईन्सने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं अनुराग कश्यपने सांगितलं.
इंडिगो एअरलाईन्सचं तिकीट सोमवारी दुपारचं होतं आणि विस्ताराचं सकाळी होतं. विस्ताराच्या विमानाने येण्यासाठी मला पहाटे 4 वाजता उठावं लागणार, असं मला आयोजकांनी सांगितलं. त्यावेळी मी पहाटे 4 वाजता उठेन, मात्र इंडिगोच्या विमानाने प्रवास करणार नाही, असं अनुरागने सांगितलं.
No @IndiGo6E .. on @airvistara .. in solidarity with @kunalkamra88 pic.twitter.com/HagCufQf34
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) February 3, 2020
काय आहे हे प्रकरण?
दिल्लीहून लखनौ येथे जाणाऱ्या फ्लाइट नंबर 6E 5317 मध्ये 28 जानेवारीला कुणाल कामराची भेट पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत झाली. कुणालने यादरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यासोबत वाद घातला. विविध विषयांबाबत कुणालने त्यांना प्रश्न विचारले. मात्र अर्णब गोस्वामी त्याच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नव्हते. या सर्व प्रकाराचा कुणालने व्हिडीओ शूट केला होता. ज्यामध्ये तो सतत अर्णब गोस्वामी यांना प्रश्न विचारत असल्याचं दिसून येत होतं. कुणालने अर्णब गोस्वामी यांच्यासाठी 'कायर' शब्दाचा वापर केल्याचं व्हिडीओमध्ये समजत आहे. हा व्हिडीओ कुणालने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे. कुणाल कामराने आणखी एक ट्वीट करत फ्लाइटमधील इतर प्रवाशांची माफी मागितली होती. तसेच मी काहीही चुकीचं केलं नसल्याचंही कुणालने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
I did this for my hero... I did it for Rohit pic.twitter.com/aMSdiTanHo
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 28, 2020
इंडिगोकडून कुणाल कामरावर बंदी
इंडिगोने एक ट्वीट केलं आहे की, मुंबईमधून लखनौला जाणाऱ्या 6E 5317 फ्लाइटमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडी पाहता आम्ही कुणाल कामराला सहा महिन्यांसाठी इंडिगोच्या फ्लाइटमधून प्रवास करण्यासाठी बंदी घालत आहोत. कारण फ्लाइटमधील त्याची वागणूक ही चूकीच्या पद्धतीची होती. त्यामुळे आम्ही आमच्या प्रवाशांना सांगू इच्छितो की, फ्लाइटमध्ये कोणत्याही व्यक्तीची बदनामी करणं टाळा. कारण यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो.
संबंधित बातम्या
कुणाल कामराचा विमानात अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद; इंडिगोकडून कामरावर सहा महिन्यांची बंदी
कुणाल कामराची इ़ंडिगो एअरलाईन्सला नोटीस, 25 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी