कुणाल कामराची इ़ंडिगो एअरलाईन्सला नोटीस, 25 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी
इंडिगो एअरलाइन्सने घातलेल्या सहा महिन्यांच्या बंदीविरोधात कुणालने कंपनीला नोटीस पाठवली आहे. तसेच 25 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.
मुंबई : इंडिगो एअरलाइन्सने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या बंदीविरोधात कुणाल कामराने इंडिगो एअरलाईन्सला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये आपल्यावरील बंदी उठवावी आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल 25 लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्याने इंडिगो एअरलाइन्सकडे केली आहे.
कुणाल कामराने ट्वीट करत त्याच्या समर्थकांचे आभार मानले. तुमच्या पाठिंब्यामुळे इंडिगो एअरलाईन्सच्या विरोधात दाद मागण्यास मदत मिळाली. लॉमेन अँड व्हाइट यांनी ही लढाई विशेष केस म्हणून स्वीकारली आहे, अशी माहिती कुणालने ट्वीटमधून दिली आहे. इंडिगो एअरलाइन्सने माफी मागावी आणि सर्व वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांना याची माहिती द्यावी, अशी मागणी कुणालने केली आहे.
As I’m the subject hence I can’t be objective on this matter... https://t.co/K39BEcwpaV
— Kunal Kamra (@kunalkamra88) February 1, 2020
काय आहे हे प्रकरण?
दिल्लीहून लखनौ येथे जाणाऱ्या फ्लाइट नंबर 6E 5317 मध्ये कुणाल कामराची भेट पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत झाली. कुणालने यादरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यासोबत वाद घातला. विविध विषयांबाबत कुणालने त्यांना प्रश्न विचारले. मात्र अर्णब गोस्वामी त्याच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नव्हते. या सर्व प्रकाराचा कुणालने व्हिडीओ शूट केला होता. ज्यामध्ये तो सतत अर्णब गोस्वामी यांना प्रश्न विचारत असल्याचं दिसून येत होतं. कुणालने अर्णब गोस्वामी यांच्यासाठी 'कायर' शब्दाचा वापर केल्याचं व्हिडीओमध्ये समजत आहे. हा व्हिडीओ कुणालने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे. कुणाल कामराने आणखी एक ट्वीट करत फ्लाइटमधील इतर प्रवाशांची माफी मागितली होती. तसेच मी काहीही चुकीचं केलं नसल्याचंही कुणालने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
इंडिगोकडून कुणाल कामरावर बंदी
इंडिगोने एक ट्वीट केलं आहे की, मुंबईमधून लखनौला जाणाऱ्या 6E 5317 फ्लाइटमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडी पाहता आम्ही कुणाल कामराला सहा महिन्यांसाठी इंडिगोच्या फ्लाइटमधून प्रवास करण्यासाठी बंदी घालत आहोत. कारण फ्लाइटमधील त्याची वागणूक ही चूकीच्या पद्धतीची होती. त्यामुळे आम्ही आमच्या प्रवाशांना सांगू इच्छितो की, फ्लाइटमध्ये कोणत्याही व्यक्तीची बदनामी करणं टाळा. कारण यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो.
कुणाल कामराचा विमानात अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद; इंडिगोकडून कामरावर सहा महिन्यांची बंदी