Presidential Election 2022 : शरद पवार यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा : खासदार नवनीत राणा
Presidential Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली
Navneet Rana : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (Presidential Election 2022) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली. तसंच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन आणि धन्यवाद करतानाच, त्यांचा निर्णय हा दबावातच झालेला आहे, असाही टोलाही खासदार नवनीत राणा यांनी लगावला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा माझी विंनती आहे की त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, त्यामुळे आदिवासी समाजात विश्वासाची भावना निर्माण होईल असं नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
शरद पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना पाहून, त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक जण काम करतात. आदिवासींना आज सगळ्यांची समर्थनाची गरज आहे. पहिल्यांदा आज आदिवासी समाजातून तळागळातून काम करुन एक महिला वर आली आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत किंवा त्यांना मोदीजींनी समर्थन दिला आहे, हा विचार न करता त्या कोणत्या समाजातून येतात आणि किती धडपड करुन त्या इथे आल्या आहेत. त्या समाजाच्या पाठिशी आपण सगळे आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी पवार साहेबांना विनंती करते की, त्यांनी आपल्या सगळ्या आमदार आणि खासदारांचं समर्थन द्यावं.
द्रौपदी मुर्मू आज मुंबईत
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत प्रचारासाठी येणार आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेने (Shivsena) मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्या मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची भेट घेणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याआधीच्या राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवारांनी मातोश्रीवर जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे. तूर्तास त्यांचा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जाहीर केलेली असंसदीय शब्दांची यादी योग्य : नवनीत राणा
दरम्यान आज संसदीय सचिवालयाने असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली ती अतिशय योग्य आहे. जेव्हा कोणी लोकसभेत बोलतो तेव्हा संपूर्ण देश पाहत असतो त्यामुळे विरोधकांकडून निघणाऱ्या अपशब्दाला आळा बसेल, याचं मी स्वागतच करेन असं नवनीत राणा म्हणाल्या. भाजपला काही भीती वाटत नाही, नव्या पिढीचे खासदार लोकसभेत बसतात त्यामुळे भाषेची मर्यादा असलीच पाहिजे. देशाला एकमताने नेण्याचे काम भाजप आणि नरेंद्र मोदीजी करीत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांवर बंदी असलीच पाहिजे. केंद्र सरकार द्वेषयुक्त भाषण विरोधी कायदा आणण्याच्या तयारीत आहे त्याला मी पाठिंबा देईल, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.