'जलील ओविसींचा चमचा, तुझ्यासारखे किती आले किती गेले'; नवनीत राणांची जहरी टीका
Amravati News : राणा यांना जलील यांच्याकडून अकोल्यातील सभेतून प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता जलील यांच्यावर नवनीत राणा यांनी कडाडून टीका केली आहे.
Amravati News : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर टीका केल्याने राणा यांना जलील यांच्याकडून अकोल्यातील सभेतून प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता जलील यांच्यावर नवनीत राणा यांनी कडाडून टीका केली आहे.
'या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल', असे म्हणणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करतांना, 'तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून हे देश आला आहे का?, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. आता त्यांच्या याच टीकेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'इम्तियाज जलील हा ओवेसीचा चमचा असून, तुझ्या सारखे किती आले अन् किती गेले' असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
जय श्रीराम बोलावेच लागेल...
इम्तियाज जलील यांच्यावर टीका करतांना खासदार नवनीत राणा म्हणाले की, “इम्तियाज जलील यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी अमरावतीमधून निवडणूक लढवावी. इम्तियाज जलील हा ओवेसीचा चमचा आहे. तुझ्यासारखे किती आले, किती गेले, या देशात रहायचं असेल जय श्रीराम बोलावेच लागेल. संभाजी नगरमध्ये यावेळी डाग लागणार नाही आणि यावेळी लोक जलील यांना पाडतीलच, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
असुदुद्दीन ओवेसी यांनी अधिवेशनादरम्यान संसदेत बोलतांना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. ओवेसी यांनी "बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद", असे नारेही दिले होते. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. "तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल" असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. त्यांच्या टीकेला जलील यांनी अकोला येथील जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे जलील यांच्या टीकेला आता नवनीत राणा यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहेत.
काय म्हणाले होते इम्तियाज जलील...
नवनीत राणा यांच्यावर टीका करतांना जलील म्हणाले होते की, "तुम्हाला वाटत असेल की, दिल्लीत तुमचा बाप बसला आहे. त्या बापाच्या जीवावर तुम्ही काहीही बोलणार असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे. चांगले राहाल तर आमच्याकडून देखील चांगली अपेक्षा ठेवा. पण तुम्हाला वाटत असेल की, मी काहीही बोलणार, पण लक्षात ठेवा महिला असल्याने सन्मान करतोय. स्वतःच घर सोडून रस्त्यावर ढोल वाजवण्यासाठी जाणाऱ्या याच राणा आहेत. असली नौटंकी आमच्यासोबत चालणार नाही," असे जलील म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
'तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून...'; नवनीत राणांवर बोलतांना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली