Navneet Rana : राणा दाम्पत्य आणि पोलिसांमधील वादाची मालिका सुरूच; या पूर्वी देखील अनेकवेळा वाद
Navneet Rana : अमरावतीचे राणा दाम्पत्य आणि पोलिसांमधील वादाची मालिका अजूनही सुरूच आहे. या पूर्वी देखील राणा दाम्पत्य आणि पोलिसांमध्ये अनेकवेळा वाद झालाय.
अमरावती : राणा दाम्पत्य आणि पोलिसांमधील वादाची मालिका अजूनही सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध का लागत नाही याचा जाब विचारला होता. यावेळी त्यांनी पोलिसांसोबतच राडा घातला. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच दोषी ठरवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. परंतु, बेपत्ता मुलीने आपण स्वत:च्या मर्जीने गेलो होते असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर देखील पोलीस आणि राणा दाम्पत्यामधील हा वाद अद्याप मिटलेला नाही.
आतापर्यंत अनेकवेळा राणा दांपत्य आणि पोलिसांमध्ये वाद
शेतकरी आंदोलना दरम्यान मुंबईला निघालेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी डिटेन करून पोलीस आयुक्तालयात नेले होते. त्यानंतर आयुक्तालायच्या पायऱ्यांवर बसून खासदार नवनीत राणा यांनी निदर्शने केली होती. या प्रकरणात अमरावती पोलीस आयुक्त आणि तत्कालीन पोलीस उपायुक्त यांची लोकसभा सचिवलयात तक्रार केली होती. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना हक्कभंग समितीसमोर हजेरी लावावी लागली होती. या प्रकरणी अद्याप निर्णय झालेला नाही.
राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा बसवल्यानंतर पोलिसांनी राणा यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केल्यामुळे पोलिसांसोबत वाद आणि प्रचंड घोषणाबाजी झाली होती.
अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणात अटक असलेल्या आरोपींना राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा भेटीसाठी आल्या होत्या होत्या त्यावेळी पोलिसांनी भेट नाकारल्याने खासदार राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.
मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरणानंतर अटक असलेल्या आजारी आरोपीला रुग्णालयात भेटीसाठी गेल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्याशी वाद घालून हुज्जतबाजी करण्यात आली होती.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. त्यावेळी लॉकअपमध्ये छळ केल्याचा आरोप करीत मुंबई पोलिसांसोबत वाद घातला होता. या प्रकरणानंतर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांची लोकसभा सचिवलयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर देखील संबंधित अधिकाऱ्यांना समितीपुढे हजेरी लावावी लागली होती. याही प्रकरणात निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
अमरावती शहरातील बेपत्ता असलेल्या महाविद्यालयीन तरुणीला लव्ह जिहादमध्ये पळवून नेल्याचा आरोप करीत राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राणा यांनी प्रचंड राडा घातला. पोलीस निरीक्षकांचा फोन हिसकावला तर पोलीस उपायुक्तासोबत वाद घातला होता.
राणा दांपत्य आणि पोलीस वाद हा काही नवीन राहिला नाही. पण यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लव जिहाद प्रकरणी बेपत्ता असलेल्या मुलीला शोधून काढण्याच्या मागणीसाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी थेट पोलिसांनाच माझं कॉल रेकॉर्ड का केला असं बोलून प्रचंड राडा केला. त्यामुळे आता राणांवर अनेक संघटना आणि विविध पक्षातून त्यांचा विरोध सुरू झाला आहे. आता पोलीस कोणती भूमिका घेतात आणि काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या