(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati News : पैशाचा मोह नडला, अन् मांत्रिकाचाच काटा काढला! नेमकं प्रकरण काय?
Amravati Crime News : जादुटोण्याद्वारे पैश्यांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाची हत्या झाल्याचं समोरं आलं आहे.
चांदूर रेल्वे : जादुटोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाची हत्या झाल्याची घटना अमरावतीमध्ये (Amravati) समोर आली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवनी शिवारातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आजच्या आधुनिक जगातही लोक अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं धक्कादायक वास्तव यातून पुन्हा समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पाच आरोपी नागपुरवरून ताब्यात घेण्यात आले आहेत.
पैशाचा मोह नडला, अन् मांत्रिकाचाच काटा काढला!
जादुटोण्याद्वारे पैश्यांचा पाऊस पाडण्याचा प्रलोभनात झालेल्या फसवणुकीच्या आकसापोटी एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवनी शेतशिवारात ही घटना उघडकीस आली आहे. एक झोपडीत मृतहदेह आढळल्याने तपासअंती पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासचक्रे फिरवीत पाच आरोपींना नागपुरवरून अटक केली आहे.
पैश्यांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक
मृतकाने आरोपींना पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं आणि तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता. मात्र, मृतकाने आरोपीकडून पैसे घेऊन बतावणी केल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडला नाही आणि टाळाटाळ करत राहीला. यामुळे आरोपी आणि मृतक यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीनी मयताच्या डोक्यावर फावड्याच्या दांड्याने आणि काठीने मारून त्याची हत्या केली आणि घटनस्थाळावरून पसार झाले होते.
घराच्या सुख शांतीसाठी 28 लाखांचा लागला चुना
घरात सुख शांती लाभावी, आरोग्य चांगलं राहावं यासाठी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला जादूटोणा, धार्मिक विधीच्या नावाखाली तब्बल 28 लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील धानोरी भागात राहणाऱ्या एका 38 वर्षीय व्यक्तीला घरातील अडचणी दूर करण्याच्या बहाण्याने जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली 28 लाखांचा ऐवज उकळल्याचा प्रकार उघडकीस समोर आला आहे. विशेष म्हणजे फिर्यादी यांच्या पत्नीच्या भावाने हा सगळा प्रकार घडवून आणला आहे. फिर्यादी हे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना काही घरगुती समस्या होत्या. या दरम्यान फिर्यादी यांच्या पत्नीच्या भावाने त्यांना "कुलकर्णी काका" या ज्योतिषाची ओळख करून दिली आणि त्यानंतर त्यांची फसवणूक झाली.