Graduate Constituency Elections Amravati : अमरावती विभाग पदवीधरमध्ये मतदानाचा टक्का घसरला; उमेदवारांमध्ये वाढली धाकधूक
निवडणूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 49.67 टक्के मतदान झाले. मात्र 2017मध्ये झालेल्या अमरावती पदवीधर निवडणुकीत 63.50 टक्के मतदान झालं होतं हे विशेष.
Amravati Graduate Constituency election : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मात्र 2017 च्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी तब्बल 13.5 टक्के घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजीत पाटील तिसऱ्यांदा निवडणुक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्याशी त्यांचा सामना आहे. मात्र, पक्षांतर्गत नाराजी, महाविकास आघाडीचा उमेदवार, पक्षातीलच एका कार्यकर्त्याची बंडखोरी अशा आव्हानांचा डोंगर डॉ. रणजीत पाटलांसमोर आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 2 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.
निवडणूक विभागाकडून मिळालेल्या अंतिम टक्केवारीनुसार सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 49.67 टक्के मतदान झाले. मात्र 2017मध्ये झालेल्या अमरावती पदवीधर निवडणुकीत 63.50 टक्के मतदान झालं होतं हे विशेष. त्यामुळे या कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फटका कोणाला बसणार यासंदर्भात तर्क लढविण्यात येत आहे. अमरावती विभागात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यासह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही मतदान झाले. यापैकी सर्वाधिक 58.87 टक्के मतदान यवतमाळ येथे झाले आहे. तर अमरावतीमध्ये 43.37 टक्के, अकोलामध्ये 46.91 टक्के, बुलढाणामध्ये 53.04, वाशिम 54.80 टक्के मतदान झाले आहे.
आमदार प्रा. बी.टी. देशमुखांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ. बीटी तब्बल सहावेळा येथून विजयी झालेले. मात्र, 2010 मध्ये भाजपाचे रणजीत पाटील बीटींना हरवत 'जायंट किलर' ठरलेत. 2010 आणि 2016 अशा सलग दोन टर्म रणजीत पाटलांनी येथील मैदान मारलं. या दोन टर्ममध्ये आमदार आणि अनेक खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी सभागृह आणि सभागृहाबाहेर 'अभ्यासू' अशी छाप पाडलीय. मात्र, तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या रणजीत पाटलांसमोर मोठी आव्हानं आहेत.
काँग्रेसकडून येथील उमेदवारीवरून मोठा घोळ घालण्यात आला. पक्षात चार-पाच इच्छुक असताना काँग्रेसनं ऐनवेळी ठाकरे गटाच्या धीरज लिंगाडेंना उमेदवारीसाठी आयात केलं. त्यामुळे लिंगाडेंच्या उमेदवारीवरून मविआतच समन्वयाचं मोठं आव्हान असण्याची शक्यता आहे. डॉ. रणजीत पाटलांसमोर प्रमुख आव्हान असलेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईकांचे बंधू अरूण सरनाईक रिंगणात आहे. यासोबतच डॉ. पाटलांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शरद झांबरे यांनी त्यांच्याविरोधातच शड्डू ठोकलाय. भाजपाच्या नाराजांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा झांबरेंना आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्षांनी डॉ. रणजीत पाटीलच विजयी होणार दावा केला आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात...
मतदारसंघात एकूण पाच जिल्हे आहेत. त्यात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळचा समावेश आहे. या जागेसाठी एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच 2 लाख 6 हजार 172 मतदार आहेत. या लढतीत डॉ. रणजीत पाटील (भाजप), धीरज लिंगाडे (काँग्रेस), प्रा. अनिल अंमलकार (वंचित), शरद झांबरे (भाजप बंडखोर) हे प्रमुख उमेदवार आहेत.
ही बातमी देखील वाचा...