...तर उद्धव ठाकरेंचं स्वागत करू, विदर्भातील शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे येत्या काही दिवसात पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत.
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे येत्या काही दिवसात पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान विदर्भातील पोहरादेवीला जाणार आहेत. ते बंजारा समाजातील बाबूसिंग महाराज यांची देखील भेट घेणार आहेत. दरम्यान, अकोला विमानतळावर उद्धव ठाकरे यांचा आगमन झाल्यास निश्चित त्यांचे स्वागत केल्या जाईल, असं शिंदे गटातील अकोला जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपासोबत राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात सामील झालेल्या 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यानंतर सेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झालेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या गटातील मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का दिला आहे. यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलेय. संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे ठाकरेंकडून देशमुख यांना बळ दिले जात आहे. दरम्यान, देशमुख यांच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेशानंतर शिवसेना प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे येत्या काही दिवसात पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे शेवटी महाराष्ट्राचे नेते
दरम्यान, आता शिंदे गटातील अकोल्याचे माजी आमदार तथा शिंदे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांनी एक विधान केलं आहे. जर उद्धव ठाकरे पोहरा देवी येते जात असल्यास आणि अकोला शिवनी विमानतळ त्यांचं आगमन झाल्यास यावेळी त्यांचे निश्चित स्वागत केलं जाईल. बाजोरिया पुढे बोलताना म्हणाले आहेत की, ते नेते आहेत. भविष्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन अन् चळवळ पुढे घेऊन जात असताना, त्यावेळी माणसाचे वेगवेगळे विचार होऊ शकतात. बाळासाहेबांनी जी चळवळ निर्माण केली होती. तसेच विचार त्यांचे दिसत नाही. दरम्यान, बाजोरिया यांना अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागता संदर्भात प्रश्न विचारला असता, त्यावर योग्य वेळेवर योग्य विचार करू, त्यावेळी मी मुंबई अथवा बाहेरगावी असेल तर त्यांचं स्वागत करता येणार नाही. अकोल्यामध्ये जर असेल तर नक्कीच स्वागत करण्यामध्ये काही गैर नाही. राहुल गांधी का असेना, शेवटी नेते आहेत. त्यांची विचारधारा वेगळी असू शकते, परंतु स्वागत आणि विचारधारा, यामध्ये फरक आहे, असं ही ते म्हणाले आहेत.