Amol Mitkari : 'खासदार अमोल कोल्हे लवकरच अजितदादांसोबत येतील', अमोल मिटकरींचा दावा
Amol Mitkari : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अमोल कोल्हे लवकरच अजित पवारांसोबत येणार असल्याचा दावा केलाय.
मुंबई : 'राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) लवकरच अजितदादांसोबत येतील' असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते. अमोल कोल्हेंचं प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडे असल्याचे संकेत दोन महिन्यांपूर्वी मिटकरींनी 'माझा'शी बोलतांना दिले होते. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार गटाकडेच मिळणार असल्याचा आशावाद मिटकरींनी व्यक्त केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन भरकटत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. जरांगे पाटील यांच्या छगन भूजबळांसंदर्भातील भाषेवरही त्यांनी शंका उपस्थित केलीय.
नुकतीच अजित पवार गटाकडून लोकसभेतील खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आलं होतं. यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आलं. अमोल कोल्हे यांनी आधीच अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करत आपला पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आली होती. पण, अजित पवार गटाला जरी शपथपत्र दिलं असलं तरी त्यांनी शरद पवार गटाला देखील शपथपत्र देत आपण शरद पवार गटासोबत असल्याचा दावा केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
अमोल कोल्हे लवकरच अजितदादांसोबत येतील - अमोल मिटकरी
मला शिवसंदेश यात्रेत संधी ही अजित पवार अमोल कोल्हेंमुळे मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वामध्ये एखाद्या यात्रेत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली तर आणखी आनंद होईल. राज्यसभेतील आणखी काही खासदारांची प्रतिज्ञापत्रं आमच्याकडे आहेत. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे देखील लवकरच अजित दादांसोबत येतील असा दावा देखील अमोल कोल्हे यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचीच - अमोल मिटकरी
सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यांच्या लढाई सुरु आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांचीच असून निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांनी गटालाच मिळणार असल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली.
जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटतयं - अमोल मिटकरी
मनोज जरांगे यांचं आंदोलन सध्या भरकटत असून त्यामध्ये आता राजकारण घुसलंय. भुजबळ हे मोठे नेते आहे, त्यांच्याविरुद्ध जरांगेंची भाषा ही आक्षेपार्ह्य आहे. जरांगे हे राजकीय वक्तव्यांमुळे दूर जाणार असल्याची शक्यता देखील यावेळी मिटकरींनी बोलताना व्यक्त केली.