(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bacchu Kadu : भाजपने आपल्यासोबत राहणाऱ्यांविरोधात फिल्डिंग लावायचे धंदे बंद करावेत; बच्चू कडूंचा हल्लाबोल
Bacchu Kadu : प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी आता भाजपवरच हल्लाबोल करत इशारा दिला आहे.
अकोला : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मंत्रिपद आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असलेले प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी आता भाजपवरच हल्लाबोल केला आहे. भाजपने आपल्यासोबत उभं राहणाऱ्यांची फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत, असा थेट हल्लाबोल बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. काँग्रेस (Congress) आणि इतर पक्षांकडून जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास भाजपकडून (BJP) होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
'प्रहार जनशक्ती पक्षा'चे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी अकोल्यात (Akola) भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र, आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडूंनी ठणकावले आहे. आपल्याला त्रास देण्यासाठी भाजपनं आणखी दोन आमदार, तीन खासदार लावावेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. याला आपण घाबरणार नसल्याचे ही बच्चू कडू यांनी म्हटले.
भाजपनं मैत्री करताना आणि मित्रत्व निभावतांना ते सर्वच प्रकारे निभवावं. फक्त कामापुरतं वापरून फेकून द्यावं, असं करू नये असंही बच्चू कडू यांनी म्हटले. भाजपनं आपल्याच सोबत राहणाऱ्यांची फील्डिंग लावायचे धंदे बंद करावेत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. गेल्या काही काळात बच्चू कडू यांचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याशी वाद चांगलाच गाजला होता. याला भाजपचं समर्थन असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मागील काही काळात भाजपने अमरावती जिल्ह्यात (Amaravati) पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी जोर लावला आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर भाजपने त्यांना आपल्या गोटात वळवले. त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) हे देखील भाजपच्यासोबत आहेत. तर, आमदार बच्चू कडू हे अमरावतीमधील अचलपूर मतदारसंघातून आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 81,252 मते मिळाली होती. तर, काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध देशमुख यांना 72,856 मते मिळाली होती.