Maharashtra Assembly Election 2024 : संजय राठोडांविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार? 'या' महंतांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांकडून विविध मतदारसंघात दावेदारी केली जात आहे. आता यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज विधानसभा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. बंजारा महंत सुनील महाराज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातून (Digras Assembly constituency) त्यांनी ठाकरे गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. दिग्रसमध्ये सध्या मंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathod) हे विद्यमान आमदार आहेत.
संजय राठोड यांच्याविरोधात 'बंजारा कार्ड'?
संजय राठोड हे शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Group) गेल्यानंतर सुनील महाराज यांनी शिवेसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. दिग्रसशिवाय सुनील महाराज यांनी पोहरादेवी समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघावरही (Karanja Assembly Constituency) दावा केला आहे. दोन्ही मतदारसंघात बंजारा मतांचे प्रमाण लक्षणीय आहे. संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दोन महंत निवडणुकीच्या आखाड्यात?
दरम्यान, सुनील महाराज यांच्या व्यतिरिक्त दुसरे महंत असलेले जितू महाराज (Jitu Maharaj) यांनी देखील कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे दावेदारी केली आहे. जितू महाराज हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपत सक्रीय आहेत. कारंजाचे सध्याचे आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांच्या निधनानंतर भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. सुनील महाराज आणि जितू महाराज यांना कारंजा मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघात पोहरादेवीचे दोन महंत निवडणूक आखाड्यात भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सुनील महाराज यांना नेमकी कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या