Akola Rain Updates: अकोल्यात धुवांधार पाऊस; पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल तेरा तासांनी सापडला
Akola Rain Updates: अकोल्यात रात्री धुवांधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसानं खैरमोहम्मद प्लॉट भागातील ओढ्याला पूर आला होता, याच पुरामध्ये जियान अहमद एकबाल अहमद हा चिमुकला वाहून गेला होता.
Akola Rain Updates: अकोल्यामध्ये (Akola News) गेल्या काही दिवसांपासून धुवांधार पाऊस सुरू आहे. नदीकाठच्या घरांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी घुसलं आहे. अशातच अकोल्यातील मुसळधार पावसात खैरमोहम्मद प्लॉट भागातील एक चिमुकला ओढ्याच्या पुरात वाहून गेला होता. आता या चिमुकल्याचा मृतदेह हाती लागला आहे. जियान अहमद एकबाल अहमद असं या चिमुकल्याचं नाव असून ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात रात्री धुवांधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसानं खैरमोहम्मद प्लॉट भागातील ओढ्याला पूर आला होता, याच पुरामध्ये जियान अहमद एकबाल अहमद हा चिमुकला वाहून गेला होता. रात्री घराजवळ जियान आपल्या मित्रांसोबत खेळत होता. मुसळधार पावसामुळं अचानक ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्याचवेळी ओढ्याच्या पाण्यात खेळताना जिहान पुराच्या पाण्यात वाढून गेला. जिहान पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच, प्रशायकीय यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जिहानचा शोध सुरू करण्यात आला.
मध्यरात्रीपासूनच बचाव पथकाकडून जिहानचा शोध सुरू होता. तब्बल तेरा तासांच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी दहा वाजता जिहानचा मृतदेह आढळून आला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर पाण्यात बुडून जिहानचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात धुवांधार पाऊस
अकोला जिल्ह्यात ढगफुटूसदृश्य पाऊस झाला आहे. अकोल्यात गेल्या 24 तासांत 125.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरातील काही भागांत नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे. यासोबतच डुबकी रोड, गायत्री नगर भागातील घरांमध्ये पाणी घुसलं होतं. काल रात्री अकोला बसस्थानकावरील फलाटावर पाण्याची गळती झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. नुकतीच पेरणी झाल्यानं या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं नसलं तरी शेतात पाणी साचल्यानं जमिनीचं मोठं नुकसान झालं आहे.