(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola News : अकोल्यात भाजप आमदार वसंत खंडेलवाल यांना लुटण्याचा प्रयत्न; पोलिस स्थानकात तक्रार दाखल
Akola News : एका ऑटोतून आलेल्या लोका़ंनी आपल्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आमदार खंडलेवालांनी केली आहे.
Akola News : भाजपचे अकोल्यातील विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. रात्री 10.05 वाजता गोरक्षण मार्गावरील खंडेलवाल भवनसमोर ही घटना घडली आहे. येथे एका ऑटोतून आलेल्या लोका़ंनी आपल्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आमदार खंडलेवालांनी केली आहे. आमदार वसंत खंडेलवाल हे अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. दरम्यान, आमदाराला लुटण्याचा प्रयत्न करणारा ऑटोचालक आणि ऑटो ताब्यात घेण्यात आली आहे.
ऑटोचालकासोबत आणखी दोन लोक असल्याची माहिती आमदार वसंत खंडेलवाल यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. आमदार वसंत खंडेलवाल पश्चिम विदर्भातील मोठे सराफा व्यावसायिक आहेत. ते गांधी रोडवरील आपल्या सराफा दुकानातून खंडेलवाल भवनामागील आपल्या घरी सोने खरेदी-विक्रीची रक्कम घरी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. आमदार वसंत खंडेलवालांनी याप्रकरणी खदान पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अकोल्यातील दंगलीनंतर थेट सत्ताधारी आमदाराला लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे. आमदार वसंत खंडेलवालांना गेल्या पाच दिवसांपासून अकोला पोलिसा़ंनी कोणतीही सुरक्षा पुरविलेली नव्हती. त्यांनी अकोला दंगलीत आपल्या सुरक्षारक्षकाने आपल्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याने त्याची तक्रार करीत त्याला परत पाठवलं होतं. या घटनेनंतर अकोल्यातील कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवली गेल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालं आहे.
कशी घडली घटना?
बातमी आहे विधान परिषदचे भाजप आमदार वसंत खंडेलवाल आणि एका रिक्षाचालकामध्ये झालेल्या शाब्दिक वादाची. आमदार वसंत खंडेलवाल गांधी रोडवरील आपल्या सोन्याच्या दुकानातून काम आटोपून घरी परतीच्या मार्गावर असताना अगदी घराजवळील खंडेलवाल भवनजवळ रस्त्याच्या मधोमध एक रिक्षा उभी होती. ही रिक्षा बाजूला घ्या, असा आग्रह आमदारांनी रिक्षा चालकाला केला. मात्र, रिक्षाचालक ऐकायला तयार नव्हता. आमदार गाडीच्या खाली उतरले अन् त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर आमदारांनी रिक्षाचे फोटो काढायला सुरुवात केली, त्यावेळी चक्क रिक्षावाल्याने त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. हा प्रकार रविवारी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी अकोला शहरातील खंडेलवाल भवनजवळ घडला. हा वाद स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास पडला. लागलीच स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केली आणि रिक्षाचालकाला समजावलं. आपण वाद घालत असलेला समोरील व्यक्ती आमदार असल्याचे त्यांनी रिक्षाचालकाला म्हटलं. त्यानंतर रिक्षाचालकाने मोबाईल रस्त्यावर ठेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
हा आपल्याला लुटण्याचा प्रयत्न : आमदार वसंत खंडेलवाल
या संदर्भात 'एबीपी माझा'ने आमदार वसंत खंडेलवाल यांच्याशी संपर्क केला. त्यांनी हा संपूर्णपणे आपल्याला लुटण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून आपल्याला अकोला पोलिसा़ंनी कोणतीही सुरक्षा पुरविलेली नसल्याचा आरोप आमदार खंडेलवालांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला आहे. त्यांनी अकोला दंगलीत आपल्या सुरक्षारक्षकाने आपल्या सुरक्षेची पुरेसी काळजी न घेतल्याने त्याची तक्रार करीत त्याला परत पाठविलं असल्याचं म्हटलं आहे.
अकोल्यातील ऑटोचालकांना आवरण्याची गरज
अकोला शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडतायत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरात कारवाई सुरू करायला पाहिजे. आज ऑटो वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. बेशिस्त ऑटो चालकांमुळे शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागात रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी तोडगा निघायला पाहिजे अशा सूचना आमदार वसंत खंडेलवाल यांनी पोलिसांना दिल्या आहेत.