Akola News : भाज्यांपासून नैसर्गिक रंग, 15 महिलांना रोजगार; अकोल्यातील बचत गटाला मिळत आहे लाखोंचे उत्पन्न
Akola News : सूर्योदय महिला बचत गट हा गेल्या दशकभरापासून होळीसाठी नैसर्गिक रंग बनवण्याचे काम करत आहे. यावर्षी या बचत गटाला सात क्विंटल नैसर्गिक रंग बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे.
Akola News : वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी (Holi 2023). होळी हा सण रंगांचा सण आहे. होळी म्हटलं की रंग आलेच मात्र, कृत्रिम रंगांमुळे त्वचेवर होणाऱ्या दुष्परिणांमामुळे अलिकडे नैसर्गिक रंगांबद्दल (Natural Colour) मोठी जनजागृती होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा (Akola Telhara News) येथील सूर्योदय महिला बचत गट हा गेल्या दशकभरापासून होळीसाठी नैसर्गिक रंग बनवण्याचे काम करत आहे. यावर्षी या बचत गटाला सात क्विंटल नैसर्गिक रंग बनविण्याची ऑर्डर मिळाली आहे.
होळी... रंगांचा उत्सव... मात्र, होळीचं अन् पालक, बीट, पळसफुलांचं काही नातं असेल का?... तर याचं उत्तर 'होय' असं आहे. कारण, रासायनिक रंगांना पर्याय पालक, बीट, पळस फुलांपासून बनलेले नैसर्गिक रंग ठरत आहे. या नैसर्गिक रंगांचा वापर जनजागृतीमुळे वर्षागणिक वाढत आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील सूर्योदय महिला उद्योग दरवर्षी होळीच्या काळात नैसर्गिक रंग बनवण्याचं काम करतात .
नैसर्गिक रंगांचे फायदे
- नैसर्गिक रंगांचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
- त्यात वापरलेले नैसर्गिक घटक शरीराला पोषक
- कृत्रिम आणि रासयनिक रंगांमुळे होणार शरीराचं नुकसान टळतं
- नैसर्गिक रंगनिर्मितीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी
पालक, बीट, पळसफुले, हळद आणि तांदुळाचं पीठ, बडीशेप आणि जीऱ्याचं पाणी.... हे सर्व साहित्य नैसर्गिक रंग बनवण्यासाठी वापरलं जाते. दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात नैसर्गिक रंग निर्मितीचा श्रीगणेशा सूर्योदय महिला उद्योगाने केला आहे. होळीच्या महिन्यात जवळपास महिनाभर हे नैसर्गिक रंग निर्मितीचं काम चालतं. जवळपास 15 महिला या उद्योगात गुंतल्या आहेत.
महाराष्ट्रासह नेपाळच्या बाजारातही रंगांची मागणी
गेल्या दोन वर्षांपासून सूर्योदयच्या नैसर्गिक रंगांना मोठी मागणी आहे. हे रंग पूर्णपणे नैसर्गिक आणि हातांनी बनवलेले असल्याने त्याचा शरीराला कोणताही अपाय होत नाही. यावर्षी सात क्विंटल रंगांची मागणी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात यावर्षी दिंडोरी, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह यावर्षी नेपाळच्याही बाजारात त्यांच्या रंगांची मागणी आहे. यावर्षी त्यांना खर्च वजा जाता जवळपास पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा हे रंग मिळवून देणारे आहे. सूर्योदय महिला बचत गटाच्या दीपिका देशमुख यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. यामुळे महिलांना रोजगार मिळाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Holi 2023: यंदा होळीवर भद्राची सावली? संभ्रम दूर करा, जाणून घ्या होलिका दहनाची योग्य वेळ