(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अमोल मिटकरींनी रांगोळीतून व्यक्त केल्या भावना
Ajit Pawar News : अजित पवारांनी 2024 ला मुख्यमंत्री म्हणून शपत घ्यावी हा आमचा संकल्प आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी रांगोळीच्या माध्यमातून आपल्या भावना वक्तव्य केल्या आहे.
अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले. सहा महिन्यांपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवार महायुतीत (Mahayuti) गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. एवढंच नाही तर त्यांचे बॅनर देखील लागले होते. अशा चर्चांना उधाण असताना आता राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) रांगोळीच्या माध्यमातून 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना बनविण्याचा संकल्प केला आहे.
'मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…
अकोल्यातील एका कलाकाराने अजित पवार यांचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले असून त्याखाली 'मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…लवकरच…2024…' असा सूचक संदेश लिहाण्यात आला आहे. या रांगोळीचा व्हिडीओ अमोल मिटकरींनी शेअर करत त्याखाली कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही सर्वसामान्यांची भावना आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरवू. या संकल्पासह ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ आणि ‘अजितपर्व’ असा हॅशटॅगही मिटकरी यांनी वापरला आहे. अजित पवार यांना 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवणे हा संकल्प या रांगोळीद्वारे जाहीर करण्यात आला आहे.
रांगोळीतून व्यक्त केल्या भावना
हेमंत उकरीकर या कलाकाराच्या कलेतून साकारलेली ही अजित दादांची कलाकृती निश्चितच प्रत्येक महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातील भावना आहे. अजित दादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी जे विधायक निर्णय घेतले, हा भावी वाटचालीसाठीचा चांगला संकेत आहे. आज संपूर्ण जग आणि देश नवीन वर्षांचे स्वागत करत आहे. माझा परिवार सुद्धा या नवीन वर्षांचे स्वागत करताना ईश्वरा चरणी प्रार्थना करतो आहे की, या रांगोळी कलाकाराने रांगोळीत साकारलेल्या ओळी, 'मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…' हा संकल्प 2024 मध्ये पूर्ण होवो. महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा आणि महाराष्ट्राचे नेतृत्व अजित दादाच्या माध्यमातून व्हावे. तसेच पांडुरंगाची आषाढीची महत्वाची अशी मानाची महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार करतील. अशी आमची प्रार्थना ईश्वराकडे आहे. निश्चितच त्यासाठी फार मेहनत आम्हाला घ्यावी लागणार आहे. उद्यापासून प्रत्येक नवा दिवस हा संघर्ष आणि प्रचंड मेहनतीचा असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी तत्पर आहे. आमच्या परिवारातर्फे अजित दादांना 2024 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी आम्ही ही रांगोळी साकारली असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :