Air India Plane Crash : "आई मी निघालोय, पोहचल्यावर सांगतो"; विमान दुर्घटनेपूर्वी बदलापूरच्या दिपकचा आईला शेवटचा मेसेज, अन् पुढे...
Air India Plane Crash Ahmedabad : "आई मी निघालोय, पोचल्यावर सांगतो" हा शेवटचा मेसेज दिपकने आपल्या आईला केला होता, त्यानंतर अजून त्याबद्दल काहीही माहिती नसल्याने आई दिपकच्या प्रतिक्षेत आहे.

मुंबई : "आई मी निघालोय, पोचल्यावर सांगतो" हा शेवटचा मेसेज दिपकने आपल्या आईला केला होता, त्यानंतर अजून त्याबद्दल काहीही माहिती नसल्याने आई दिपकच्या प्रतिक्षेत आहे. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं फ्लाइट एआय 171 कोसळलं. या विमान दुर्घटनेत (Ahmedabad plane crash) विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. एअर इंडियाचं विमान अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टला निघालं होतं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यामध्ये महाराष्ट्रातील बदलापुरातील (Badlapur) रहिवाशी आणि एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक देखील होता. अजूनही त्याच्या प्रकृती बद्दल कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून कुटुंबाला देण्यात आलेली नाही, त्यामुळे कुटुंबीय दिपकच्या प्रतिक्षेत आहे.
कुटुंबीय दिपकच्या प्रतिक्षेत
पुढे आलेल्या माहितीनुसार दीपक हा 35 वर्षांचा असून त्याचे लग्न झाले आहे. त्याचे मूळ घर बदलापूर इथे आहे. त्याचा आई वडील दोन बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे. मात्र गेल्या 4 वर्षांपासू तो घाटकोपर इथे पत्नी सोबत राहत होता. त्याच्या वडिलांना न्युमोनिया झाल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 2 दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणले आहे. अजून दीपक बद्दल त्यांना कल्पना दिलेली नाही. दरम्यान, दिपकच्या बहिणींना एयर इंडिया कडून अहमदाबादला जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डी एन ए टेस्टसाठी त्यांना नेण्यात येणार असल्याचे सांगितलं जातंय. मात्र "आई मी निघालोय, पोचल्यावर सांगतो" बदलापूरच्या दिपकचा आईला केलेला तो मेसेज शेवटचा ठरला आहे.
बदलापूरचे दिपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती बदलापुरात त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्र परिवाराला कळताच पाठक यांच्या घरी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे आज दुपारी विमानात जाण्यापूर्वीच त्याचं आईशी फोनवरून बोलणं झालं होतं. त्यानंतर दीपकशी काही संवाद झालेला नाही. मात्र, आता दीपकचा फोन लागतो, पण तो उचलत नाही, अशी मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीने दिली. दीपकचे 4 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.
डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे हिचा मृत्यू
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रहिवाशी कु. रोशनी सोनघरे हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती.
इतर महत्वाच्या बातम्या
























