कोरोनाने लिंक तुटली, आईच्या निधनानंतर जिद्दीने स्वप्नपूर्ती; तलाठी भाऊसाहेब बनले UPSC अधिकारी
UPSC सौरव ढाकणेने यापूर्वी तीनवेळा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, मुलाखतीमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

अहिल्यानगर : अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात, पण याचा पायऱ्या न थकता न हारता जो जिना चढतो तोच यशाच्या पायरीवरही देखील पोहचतो हा यशाचा मंत्र आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील लहानश्या ढाकणवाडी गावातील सौरव ढाकणेनं युपीएससी 2024 (UPSC) च्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत तरुणाईपुढे आदर्श निर्माण केला आहे. आपल्या शेंडेफळाने अभ्यास करून मोठा अधिकारी व्हावे असे स्वप्न, मुलगा पदवीधर होताच त्याच्या आईने पाहिले होते. आपल्या आईचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानेही स्पर्धा परीक्षेतून सनदी अधिकारी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केली. त्यासाठी, भौतिक सुख सोडून मन लावून अभ्यास केला, मित्र-नातेवाईकांपासून दूर राहत स्वत:ला स्पर्धेत झोकून दिलं. तीन वेळच्या अपयशानंतर चौथ्या चेंडूवर अखेर सौरवने युपीएससीचा यशस्वी षटकार ठोकलाच. त्यामुळे, दौंडमधील तलाठी भाऊसाहेब आता मोठे साहेब बनले आहेत.
सौरवने यापूर्वी तीनवेळा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, मुलाखतीमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यशाच्या दारावर येऊन किंवा विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचून माघारी फिरावं लागायचं. तरीसुद्धा आपले लक्ष विचलित न करता त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली अन् यंदाच्या यूपीएससी परीक्षेत देशात एआयआर 628 वी रँक मिळवत आई-वडिलांसह स्वत:चही स्वप्न पूर्ण केलं. आईच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या या तरुणाचे नाव आहे सौरव राजेंद्र ढाकणे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी या गावाची लोकसंख्या 200 च्या आसपास आहे. या गावात राका म्हणजेच, राजेंद्र ढाकणे हे जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त शिक्षक, सौरवची आई सुनंदा. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा. तिन्ही मुलींचे उच्च शिक्षण झाल्याने मुलालाही उच्च शिक्षण देऊन पालकांनी मोठं स्वप्न पाहिलं. आपल्य बहिणीच्या पाऊलांवर पाऊल टाकत सौरवनेही आईच्या स्वप्नपूर्तीसाठी चिकाटीने व मेहनतीने स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली.
आईच्या निधनानंतर पुन्हा जोमाने तयारी
मुंबई व्हीजेटीआय येथून बीई सिव्हीलचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सौरव याने यूपीएससीची तयारी सुरु केली. त्यासाठी गावातून दिल्लीसारख्या नवीन शहरात त्याने पहिल्यांदा पाउल टाकले. परीक्षेचा अभ्यास सुरु असतानाचा कोरोना महामारी सुरु झाली आणि, सौरवला आपला अभ्यास अर्धवट सोडून गावी परतावे लागले. कोरोना कालावधी संपल्यानंतर सौरवने पुन्हा जोमाने यूपीएससीची तयारी सुरु केली. याच दरम्यान, त्याच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनाने खचून गेलेल्या सौरवला वडील राजेंद्र यांनी आधार देत अभ्यासाकडे लक्ष देण्याचा मोलाचा सल्ला दिला. वडिलांच्या सल्ल्याने हुरूप आलेल्या सौरवने पुन्हा तयारीला सुरवात केली. त्याने यूपीएससीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण देखील केल्या. मात्र, मुलाखतीमध्ये त्याला अपयश आले. त्यानंतर, दौंड येथे तलाठी म्हणून रुजू होऊन सुद्धा सौरवने यूपीएससीची तयारी सुरूच ठेवली होती. अखेर, त्याच्या जिद्दीला यंदाच्या वर्षी यश मिळाले आणि तो देशात एआयआर 628 वी रँक घेऊन यशस्वी झाला.
उत्तीर्ण झाल्यानंतर गावात जल्लोष, मिरवणूक
सौरवच्या युपीएससी परीक्षेतील यशानंतर त्याने कुटुंबासोबत भगवान गडावर जाऊन भगवान बाबाच्या समाधीचे दर्शन घेत आनंद व्यक्त केला. तर, मित्र परिवान, नातेवाईकांनी त्याच्या या यशाबद्दल गावात रॅली काढून जल्लोष साजरा केला, यावेळी जागोजागी औक्षण करुन त्याचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा
मोठी बातमी! भारताच्या BSF जवानाने ओलांडली 'बॉर्डर'; पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात
























