मोठी बातमी! भारताच्या BSF जवानाने ओलांडली 'बॉर्डर'; पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात
भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा एक जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे.

नवी दिल्ली : देशात एकीकडे पहलगाम दहशतवादी (Terrorist) हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच एका BSF (BSF) जवानाने सीमारेषा ओलांडली आहे. बॉर्डर ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना असल्याचे समजते. सीमारेषेवरील शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी दोन बीएसएफ जवान तैनात करण्यात आले होते. त्यापैकी, एका जवानाने सीमारेषा पार केल्याने तो पाकिस्तानी (Pakistan) रेंजर्सच्या ताब्यात गेला आहे. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या जवानाला सोडवून आणण्यासाठी फ्लॅट बैठका घेण्यात येत आहेत.
भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा एक जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे. या भारतीय जवानास पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतलं आहे. हा जवान सीमारेषेवरील कुंपणाच्या हद्दीत नो मॅन्स लँडवरील पीकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या निगराणीचे काम करत होता. मात्र, चुकीने तो पाकिस्तानी सीमा हद्दीत गेल्याने आता वेगळाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
झिरो लाईनच्या अगोदर या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करण्यास मुभा दिली जाते. त्यामुळे, पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन बीएसएफ जवान ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसण्यास गेला होता. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफ जवानाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांच्या निगराणीसाठी दोन जवान तैनात
दरम्यान, या घटनेनंतर बीएसएफचे अधिकारी बॉर्डरवर पोहोचले असून जवानाची सुटका करण्यासाठी बीएसएफच्या अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत फ्लॅट मिटींग सुरू होती. श्रीनगरची बीएसएफ बटालियन-24 ममदोट येथे शिफ्ट करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. येथील शेतकऱ्यांच्या निगरानीसाठी दोन बीएसएफ जवान तैनात होते. याच दरम्यान, जवानाने चुकीने सीमारेषा पार केली. बीएसएफकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांच्यात फ्लॅट मिटींग सुरू आहेत.























